निवृत्तीवेतन धारकांसाठीच्या उपक्रमांचा लाभ घ्या – उपमहालेखाकार जिष्णू जे राजू
कोल्हापूर, दि.16 : निवृत्ती वेतनधारकांसाठी प्रधान महालेखापाल कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहालेखाकार जिष्णू जे राजू यांनी केले.
महालेखापाल व संचालनालय, लेखा कोषागारे, मुंबई, यांच्या अधिनस्त कोल्हापूर कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात पेन्शन अदालत घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी उप महालेखापाल (प्रशिक्षणार्थी अधिकारी) सौरभ व्हटकर, अपर कोषागार अधिकारी प्रशांत जाधव, कोषागार अधिकारी अरुणा हसबे, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव रमेश लिधडे, वरिष्ठ लेखाधिकारी राजू राम्मानी, सहायक लेखाधिकारी विमल पण्णीकर, वरिष्ठ लेखापाल पुर्णिमा कुकडे, वरिष्ठ लेखापाल संदीप मिसाळ, तसेच जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमहालेखाकार जिष्णू जे राजू म्हणाले, निवृत्ती वेतन धारकांच्या समस्या निराकरणासाठी पेन्शन संवाद, व्हॉइस मेल, टोल फ्री क्रमांक, नॉलेज चॅनेल असे विविध उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. पेन्शन संवादमध्ये https://cag.gov.in/ae/mumbai/en या लिंकव्दारे समस्या नोंदविता येतात. तसेच या लिंकवर नोंदणी करुन व्हॉट्स ॲप आणि झूम कॉलही करता येतो. याबरोबरच समस्या कळविण्यासाठी 020-71177775 या क्रमांकाची व्हॉईस मेल सेवा 24 तास देण्यात आली आहे. तसेच 1800220014 या टोल फ्री क्रमांकावर पेन्शनसंबंधी समस्यांबद्दल थेट प्रतिनिधींशी संपर्क साधता येतो. तर नॉलेज चॅनेल अंतर्गत https://cag.gov.in/ae/mumbai/en/video-gallery व्दारेही समस्यांबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कोषागार अधिकारी अरुणा हसबे म्हणाल्या, महालेखापाल कार्यालयाच्या वतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पेन्शन अदालतीच्या माध्यमातून सेवानिवृत्त अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबतच्या अडचणींचे जलद रीतीने निराकरण करण्यात येत आहे. हा स्तुत्य उपक्रम असून भविष्यात या उपक्रमाला आणखी गती येईल.
यावेळी निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्ती वेतन प्रकरणाबाबत येणाऱ्या अडचणी मांडून याबाबत प्रश्न विचारले. यावेळी त्यांचे निराकरण करण्यात आले.