निढोरी-कागल फाट्यावर कंटेनर पलटी; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अडकूर येथील अरुण देसाई यांचा दुर्दैवी अंत; कंटेनर चालक किरकोळ जखमी, मोठी दुर्घटना टळली

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड-निढोरी मार्गावरील कागल फाट्याजवळ कंटेनर आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात कंटेनर दुचाकीस्वाराच्या अंगावर कोसळल्याने अरुण रामचंद्र देसाई (वय ६०, रा. अडकूर) यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक शाहबाज खान हा किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisements

   मिळालेल्या माहितीनुसार, अरुण देसाई हे अमावास्येनिमित्त आदमापूर येथे बाळूमामांचे दर्शन घेऊन दुचाकीवरून आपल्या गावी अडकूर येथे परतत होते. दरम्यान, मुरगूड-निढोरी मार्गावरील पुलाच्या पाठीमागील बाजूस आले असता कोईमतूरहून मुंबईतील भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा (क्रमांक TN ५२ AE ९९०४) चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. यावेळी कंटेनर थेट दुचाकीस्वार देसाई यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisements

अपघाताची तीव्रता मोठी असल्याने देसाई यांचा मृतदेह गंभीररीत्या छिन्नविछिन्न झाला होता. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

नागरिकांची मोठी वर्दळ; मोठी दुर्घटना टळली

अपघातस्थळाच्या बाजूलाच अनेक घरे असून तेथे खत विक्रीचे दुकान आहे. अपघाताच्या काही वेळापूर्वीच या दुकानात खत खरेदीसाठी अनेक शेतकरी आले होते. तसेच जवळच गुरुकुल आणि फिल्टर पाण्याचे ठिकाण असल्याने या परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. अमावास्येनिमित्त बाळूमामांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचीही या मार्गावर मोठी गर्दी असते.

Advertisements

अशा वर्दळीच्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. मात्र, सुदैवाने अन्य कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती समजताच अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाढदिवस असूनही सामाजिक कार्यकर्त्यांची मदतीसाठी धाव

मुरगुड येथील सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणारे शिवभक्त सर्जेराव भाट आज वाढदिवस होता त्यांच्यासोबत नेहमी असणारे ओंकार पोतदार यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली ड्रायव्हरला बाहेर काढण्यापासून मयताचे अवयव गोळा करणे आणि इतर कार्यामध्ये त्यांनी  पुढाकार घेतला तसेच मुरगूड पोलीस स्टेशन व मुरगूड शहर पत्रकार संघटना यांनीही तात्काळ मदतकार्य केले त्या मुळे त्यांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!