महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यावर अभिवाचन, परिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
मुंबई : मराठी भाषा विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी करून यंदाचा ‘वाचन प्रेरणा दिन’ १५ ऑक्टोबरला राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालये या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करणे तसेच वाचनाची आवड वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यंदा क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या ‘तृतीयरत्न’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा असूड’ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा या साहित्याच्या अनुषंगाने अभिवाचन, परिसंवाद, चर्चासत्रे आणि पुस्तक प्रदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत. वाचन प्रेरणा दिनाचे कार्यक्रम समाजमाध्यमे तसेच ऑनलाइन आणि प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करून त्यांची व्याप्ती वाढविण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत. कार्यक्रम केवळ ललित साहित्यापुरते मर्यादित न ठेवता विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, पर्यावरण, आरोग्य, संगणक आणि अवकाश विज्ञान यांसारख्या कालानुरूप विषयांचा समावेश करण्यात येणार आहे.
तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तकनिर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, ई-बुक, स्व-प्रकाशन, युनिकोडचा वापर, ऑनलाइन पुस्तकविक्री, लेखक-प्रकाशक करार, संहिता लेखन, विश्वकोशविषयक माहिती तसेच लघुपट व माहितीपट लेखन या विषयांवरील रोजगाराभिमुख उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येकाने मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला किमान एक पुस्तक भेट देऊन प्रोत्साहन द्यावे. संस्थांनी समाजमाध्यमांवर ‘मराठी वाचन कट्टा’ निर्माण करावा, आभासी किंवा प्रत्यक्ष साहित्य संमेलने भरवावीत आणि विकिपीडियासारख्या माध्यमांवर मराठी लेखन वाढविण्यासाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात. संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, एफ.एम. रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क आणि समाजमाध्यमांतून वाचनाला प्रेरणा देणारे दृकश्राव्य संदेश प्रसारित करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयांतील मराठी भाषा अधिकाऱ्यांना कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश द्यावेत. मराठी भाषा अधिकाऱ्यांनी स्थानिक साहित्यिकांना आमंत्रित करून वाचन प्रेरणा दिन साजरा करावा. जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ तसेच संबंधित विभागातील साहित्य संस्थांची मदत घेता येणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ग्रंथालये, महाविद्यालये, तंत्रमहाविद्यालये, पदविका संस्था आणि अखत्यारीतील अन्य संस्थांना कार्यक्रमांच्या सूचना द्याव्यात. शालेय शिक्षण विभागाने शाळांमध्ये, सांस्कृतिक व पर्यटन विभागाने अखत्यारीतील सांस्कृतिक संस्थांमध्ये, तर नगर विकास विभागाने महापालिका व नगरपालिकांच्या संबंधित संस्थांमध्ये वाचन प्रेरणा दिनाचे उपक्रम आयोजित करावेत. सर्व मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी वाचन संस्कृतीविषयक वर्षभरातील कार्यशाळांचे वेळापत्रक जाहीर करावे. भाषा संचालनालय आणि विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकांची तसेच मराठी भाषा विभाग व अधीनस्थ कार्यालयांच्या संकेतस्थळांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज १०० टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रमांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य असून, यासंदर्भात शासनाने वेळोवेळी जारी केलेले आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांच्या निदर्शनास आणावेत. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.