कोल्हापूर : सद्यस्थितीमध्ये वातावरणात होत असलेल्या बदलांचा परिणाम व शेती पद्धतीमध्ये अडचणी वाढत चाललेला खर्च याचा ताळेबंद बसत नसल्यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज आहे असे मत भा.कृ.अनु.प. – श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी असे व्यक्त केले. श्री सिद्धगिरी मठ व भा.कृ.अनु.प. – श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी यांच्या वतीने दोन दिवसीय नैसर्गिक शेती या विषयावरती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजीनी आपल्या संबोधनामध्ये नैसर्गिक शेतीची सत्यता लोकांसमोर मांडली व नैसर्गिक शेती करणे पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच मानवतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असल्याचे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, तसेच विशेष अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर बसवराज बिराजदार उपस्थित होते, त्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे व कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र सिंह व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र सिंह यांनी कार्यशाळा होण्यामागील उद्देश व भा.कृ.अनु.प. – श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे कार्य याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास लाभलेले विशेष अतिथी बसवराज बिराजदार यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान या योजनेविषयी सविस्तर माहिती कार्यशाळेदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना दिली. तसेच नैसर्गिक शेती पद्धती यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी त्या पद्धतीला समजून घेऊन समूहाने प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे असे आवाहन केले. जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी गटशेती, शेतकरी गट स्थापना व शेतकरी उत्पादक कंपनी यांना या पुढील कालावधीमध्ये नैसर्गिक शेतीच्या विविध योजनांमधून लाभाबाबत माहिती दिली, तसेच या सर्व समूहाने एकत्रित येऊन नैसर्गिक शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे काम करण्याची अपेक्षा केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये जमीन आरोग्य व्यवस्थापन, देशी बियाण्याचे महत्त्व, नैसर्गिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन याविषयी चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या नैसर्गिक प्रक्षेत्राची शिवार फेरीद्वारे पाहणी करण्यात आली. तसेच राज कपूर, तानाजी निकम, अशोक इंगवले व इतर प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले नैसर्गिक शेतीमधील प्रयोग शेतकऱ्यांसोबत मांडले. नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये जमिनीच्या आरोग्यासाठी व पिकांच्या आरोग्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध निविष्ठांची प्रात्यक्षिका माध्यमातून माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक मधून विविध जिल्ह्यातून सातशे हून अधिक शेतकरी उपस्थित राहिले.