राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला अपघात !  चालक जखमी

कागल (प्रतिनिधी): पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील विराज जंक्शनजवळ मोटारसायकलवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान घडला. महादेव मारुती गायकवाड (वय – ५५, रा. मुधोळ, जि. बागलकोट) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

Advertisements

याबाबत घटनास्थळावरुन व पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुधोळ येथील महादेव गायकवाड आणि विशाल गायकवाड हे पिता-पुत्र आपली स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम.एच.४८ एक्स.१५०५ या दुचाकीवरुन श्री क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा आणि कोल्हापूर येथील महालक्ष्मी येथे देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन आटोपून गांधीनगर येथून बाजाराचे साहित्य खरेदी करुन गावी परत जात असताना येथील राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथील विराज जंक्शनजवळ आल्यावर चालक महादेव गायकवाड यांना चक्कर आल्याने मोटारसायकलवरील ताबा सुटून अपघात झाला.

Advertisements

या अपघातातील दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील कठड्याला धडकल्याने महादेव गायकवाड हे राष्ट्रीय महामार्गावरुन सर्व्हिस रोडवर १५ फूट खाली पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले तर या अपघातातील दुचाकी निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात नेण्यात आली आहे.

घटनास्थळी कोगनोळी आऊट पोस्टचे हवालदार जी. एस. कळसापगोळ यांनी भेट देऊन पाहणी केली.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!