मोबाईलच्या दुनियेतून विद्यार्थ्यांना संस्कारांची ओळख; मुरगूडच्या एम.जे. लकी स्कूलचा स्तुत्य उपक्रम

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड ता . कागल येथील एम.जे. लकी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. बुधवारी (ता. २५) सकाळी शिवतीर्थ येथून प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि रावण यांच्या सजीव पात्रांसह निघालेल्या भव्य रॅलीने संपूर्ण मुरगूड शहराचे लक्ष वेधून घेतले.

Advertisements

     शिवतीर्थ येथून निघालेली ही रॅली मुख्य रस्त्यावरून जयहिंद चित्रपटगृहाकडे गेली. या रॅलीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थी ‘जय श्रीराम’ चा जयघोष करीत होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि रावण यांची सजीव पात्रे हे रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.

Advertisements

रॅलीनंतर विद्यार्थ्यांना जयहिंद चित्रपटगृहात नेण्यात आले. सकाळी १२ ते दुपारी ३ या वेळेत विद्यार्थ्यांसह पालकांनी मोफत चित्रपटाचा आनंद घेतला. यावेळी प्रभू श्रीरामांची भूमिका पत्रकार ओंकार पोतदार, लक्ष्मणाची भूमिका राज तांबट, तर रावणाची भूमिका प्रदीप भोपळे यांनी साकारली होती . तिन्ही कलाकारांच्या वेशभूषा व अभिनयाचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, गट प्रमुख सुहास खराडे , आरोग्य विभाग सभापती सत्यजितसिंह पाटील,नगरसेवक शिवाजीराव चौगले , सुनिल रणवरे ,सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुरगूडमधील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपटगृह विद्यार्थी व पालकांनी पूर्णपणे भरले होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला.

आजच्या मोबाईलच्या दुनियेत गुरफटलेल्या विद्यार्थ्यांना कुटुंब, समाज आणि संस्कार यांविषयीच्या कर्तव्यांची जाणीव व्हावी, तसेच रामायणातील आदर्श विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे एम.जे. लकी ग्रुपचे संस्थापक व चेअरमन जावेद मकानदार यांनी सांगितले.

प्रभू श्रीरामांचे आदर्श, मातृ-पितृ भक्ती, भावा-भावांमधील प्रेम, 
सत्य, त्याग व कर्तव्यनिष्ठा यांचे संस्कार आजच्या पिढीवर व्हावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. केवळ पुस्तकी शिक्षण न देता संस्कारक्षम शिक्षण देणे हाच शाळेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट पाहताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, कुतूहल व भक्तिभाव दिसून आला. पालक व नागरिकांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुरगूड नागरी पतसंस्थेचे संस्थापक हाजी धोंडिबा बाबालाल मकानदार आणि ऋषीकेश गोडबोले यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेतील शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त व राष्ट्रीय भावना निर्माण होते, अशी भावना यावेळी  व्यक्त करण्यात आली.

     यावेळी श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, व्हा. चेअरमन शशिकांत दरेकर, संचालक प्रशांत शहा, किशोर पोतदार, नामदेवराव पाटील, निवास कदम, संदीप कांबळे , कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर , यांच्यासह  दिपक शिंदे , जीवनराव साळोखे, संभाजी आंगज, नागरीक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!