कोल्हापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक केल्याच्या किरकोळ कारणावरून कोल्हापूर आणि कागलमधील काही तरुणांनी कर्नाटकातील भाविकांना महामार्गावर अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या मारहाणीत भाविकांच्या इनोवा कारची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली असून, या प्रकारामुळे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी सायंकाळी कागल येथील लक्ष्मी टेकडीजवळ घडलेल्या या थरारामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावरील कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती.
नेमकी घटना काय ?
कर्नाटकातील हुबळी परिसरातील काही भाविक दोन गाड्यांमधून कोल्हापूरला अंबाबाईच्या देवदर्शनासाठी येत होते. महामार्गावर प्रवास करत असताना भाविकांची इनोवा कार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही तरुणांची फॉर्च्युनर कार यांच्यात ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. या वादानंतर फॉर्च्युनरमधील तरुणांनी फोन करून आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले.
कागल येथील लक्ष्मी टेकडीजवळ एका शाळेसमोर थेट महामार्गावर एक ट्रक आडवा लावून भाविकांची इनोवा कार अडवण्यात आली. त्यानंतर संशयित तरुणांनी कर्नाटकातील प्रवाशांना कारमधून ओढून बाहेर काढले आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात कार चालकाला गंभीर मारहाण झाली असून, इनोवा कारची मागील काच फोडून वाहनाचे मोठे नुकसान करण्यात आले आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?
हाणामारीचा हा थरार महामार्गावरील अनेक वाहनचालकांनी दुरूनच पाहिला. धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार सुरू असताना कोल्हापूर पोलिसांची एक जीप त्याच रस्त्यावरून कोल्हापूरच्या दिशेने गेली, मात्र त्यांनी तिथे थांबण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप केला जात आहे. काही वेळानंतर कागल पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तोडफोड झालेली इनोवा बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.
या घटनेमुळे कोल्हापूरच्या प्रतिमेवर आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गावरील अशा प्रकारच्या गुंडगिरी आणि झुंडशाहीला वेळेत आळा बसला नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत नोंद झाली नसली, तरी पोलिसांनी या घटनेची स्वतःहून (सुमोटो) दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.