मुरगुड (शशी दरेकर) : निढोरी ता. कागल येथील दुर्गप्रेमी मंचच्या वतीने आयोजित चिमुकल्यांच्या किल्ला बांधणे स्पर्धेमध्ये जय भवानी ग्रुपने बांधलेल्या सिंहगड प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. माळवाडी बॉईज ग्रुपचा द्वितीय तर सीयुजी ग्रुपच्या प्रतापगडला तृतीय क्रमांक मिळाला. सागर चितळे व प्रा. रविंद्र शिंदे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. बक्षीस वितरण शिवराजचे माजी प्राचार्य बाबासाहेब बुगडे, बी मार्टचे युवा उद्योजक सतीश पाटील व बाळूमामा बिल्डिंग मटेरियल चे युवा उद्योजक वैभव कळमकर, ओंकार पोतदार, हरी कोरे, साताप्पा तापेकर यांच्या हस्ते रोख बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
उत्तेजनार्थ बक्षीस मेन रोडचा बादशहा (रायगड), हालूबाई ग्रुप (पन्हाळा) आणि अचानक ग्रुप (तोरणा) यांना देण्यात आले. तर स्वयंम स्पोर्ट्स (प्रतापगड), वडा जवळचा राजा (तोरणा), बापू बॉईज (जलदुर्ग), शहीद भगतसिंग ग्रुप (पन्हाळा), सह्याद्रीचे मावळे (प्रतापगड) यांना सहभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण ओंकार पोतदार व प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले.

निढोरी गावचे सुपुत्र सागर चितळे यांनी नाशिक येथे झालेल्या ७व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स मधील १०० मी. धावणे, २०० मी. धावणे, ४०० मी. अडथळा शर्यत तसेच ४ X १०० रिले शर्यत या स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाबासाहेब बुगडे, सतीश पाटील व वैभव कळमकर, ओंकार पोतदार यांनी मनोगत मांडले. स्वागत सागर चितळे तर प्रास्ताविक करून आभार प्रा. रविंद्र शिंदे यांनी मानले.
‘चला किल्ले बांधूया ‘ गीताचे लॉन्चिंग
यावेळी प्रा. रविंद्र शिंदे रचित ‘मित्रांनो, दोस्तांनो छान छान किल्ला बांधूया. शिवरायांचा जयजयकार करूया.’ या बालगीताचे लॉन्चिंग मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित बालमित्रांनी टाळ्यांची साथ देत या गीताच्या सादरीकरणाला साथ दिली.