कागल : कागल येथील श्री यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये कागल तालुका विज्ञान नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत तालुक्यातील दहा शाळांच्या संघांनी सहभाग घेत विज्ञान आणि समाज या विषयांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहने पुढचा मार्ग, अंतराळातील मानवी वस्ती व महासागरांचे पुनरुज्जीवन यावर आधारित नाटिकांचे प्रभावी सादरीकरण केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय (व्हन्नुर) शाळेने, तर द्वितीय क्रमांक श्रीमंत सर पिराजीराव घाटगे कन्या विद्या मंदिर (कागल) शाळेने पटकाविला. तृतीय क्रमांक सरलादेवी माने बॉईज अँड गर्ल्स स्कूल (कागल) शाळेने मिळविला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक सिध्दनेर्ली विद्यालय (सिद्धनेर्ली) शाळेला देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचा शुभारंभ देवयानी ऐतवडेकर, विश्वजीत पाटील, आर्या पोतदार या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे, विस्तार अधिकारी आर. एस. गावडे, केंद्रप्रमुख तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकांमधून विज्ञानविषयक विषयांची प्रभावी मांडणी करत प्रेक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाला व्यासपीठ मिळाल्याने स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद ठरले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अवधूत पोतदार, विठ्ठल कुंभार, निलेश सुतार यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी केले. आभार विज्ञान शिक्षक डी. बी. साळुंखे यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. सोनम चांदणे यांनी केले. यावेळी यांच्यासह सहभागी शाळांचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
या विज्ञानात स्पर्धेमध्ये सात माध्यमिक व तीन प्राथमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. मात्र यामध्ये कागल नगरपरिषदेच्या श्रीमंत सर पिराजीराव घाटगे कन्या विद्या मंदिर या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले हा चर्चेचा विषय आहे.