बातमी

गाथा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ जगात सर्वश्रेष्ठ

आषाढी वारी आली की, पंढरपूर नगरीत भक्तांचा महापूर येतो. राबणारे शेतकरी तसेच सर्व स्तरातील लोक आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आसुसलेले असतात. काही भक्त दिंडीतून पायी जातात, काही एसटी- बसने जातात, काही रेल्वेने जातात, काही स्पेशल गाड्या करून तसेच स्वतःच्या चार चाकी वाहनाने जातात. या वारीला पंढरपुरात प्रचंड गर्दी होते.

महाराष्ट्र शासन, पोलीस खाते तसेच नगरपालिका या संस्थांवर प्रचंड ताण पडतो. कोणताही अनुचित प्रकार न होता वारी पार पाडण्याची जबाबदारी या घटकांची असते. वारकरी स्वयंशिस्तता पाळत असल्याने फारसे अनुचित प्रकार होताना दिसत नाहीत. तुकोबा, ज्ञानोबा, सावंता माळी, निवृत्तीनाथ यासारख्या अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात येतात. दिंडीच्या मार्गावर अनेक मान्यवर भक्तांनी पाणी, भोजन, औषधे, साबण, चहापाणी, नाश्ता या सोयी विनामूल्य उपलब्ध केलेल्या असतात. कोणाची गैरसोय होत नाही.

भारतीय संत परंपरा जगात सर्वश्रेष्ठ आहे. अठरा पगड जातीचे स्त्री-पुरुष एकत्र येऊन संतांनी सांगितलेले मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान ऐकतात व त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतात. अध्यात्मिक लोकशाहीचा हा झेंडा जगभर पोहोचला आहे. यामुळे महाराष्ट्राचा लौकिक जगात पसरला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात विठ्ठलाचे भक्त आहेत. तुकोबांची गाथा आणि ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ आहेत. हे ग्रंथ भागवत भक्तांनी सातशे-आठशे वर्ष सांभाळले आहेत. भारतावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली. अनेक देवालय, मंदिरे उध्वस्त झाली,

पण या दोन्ही ग्रंथांचे रक्षण सर्वसामान्य भक्तांनी केले. आता हे ग्रंथ सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. संतांनी उपकार केल्यामुळेच मानवी जीवन सुखकर झाले. परंतु आज समाजात काही विपरीत गोष्टी सतत घडताना दिसतात. अनाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासारख्या गोष्टी आपण संतांचे विचार न ऐकल्यामुळेच घडतात.

भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना संतांना फार त्रास झाला आहे. ज्ञानेश्वर माऊलींना व त्यांच्या भावंडांना कर्मठानी वाळीत टाकले. त्यांच्या आई-वडिलांना देहदंडाची (मृत्यूची) शिक्षा केली. त्यांची कोंडी करून त्यांना जगणे अशक्य केले तरी ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्यात आपल्या वेदना मांडल्या नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांनाही या कर्मठ मंडळींनी सोडले नाही. ते खालच्या जातीतील आहेत, त्यांना वेद सांगता येणार नाहीत या सबबीखाली यांचा अतोनात छळ केला. त्यांच्या अभंगांच्या वह्या नदीत बुडवून त्यांच्या ज्ञानाचा अपमान करण्यात आला.

तुकोबांचा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीरा यांनी सोने-नाणे पाठवून सन्मान करण्याचा प्रयत्न केला. पण तुकोबांनी सोने नाणे नाकारले. या सोने नाण्यांचा स्वराज्यासाठी उपयोग करा असा निरोप दिला. मी समाजाचे प्रबोधन करतो व तुम्ही समाजाचे रक्षण करा असा प्रेमाचा निरोप महाराजांना दिला.

ज्ञानाची परंपरा संतांनीच आणली. संत मोठे ज्ञानी होते. त्यांनी ज्ञानाचा उपयोग कर्मकांडावर हल्ला करण्यासाठी केला. संत सत्याचा आग्रह धरीत. तुकोबा तर नेहमी म्हणत असत, मी बहुमताला मानीत नाही जे सत्य असेल तेच स्वीकारणार. समता हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. अभंग आणि ओव्यांचा शोध संतांनीच लावला. त्यांनी मराठी भाषा समृद्ध केली. भक्ती संप्रदायाला तीन गोष्टींचा विटाळ – परद्रव्य, परनिंदा आणि परस्त्री या त्या तीन गोष्टी. सातशे वर्षापासून संतांनी स्त्रियांचा सन्मान केला आहे.

संसार करीत असताना माणसाला ज्या अडचणी येतात त्यांची उत्तरे संप्रदायात मिळतात. संतांचे साहित्य मनःपूर्वक वाचणे हीच संतांची भेट असते. संत साहित्य वाचणाऱ्याला संत भेटण्याचा आनंद मिळतो. सध्याच्या मोबाईल आणि संगणकाच्या काळातसुद्धा संतांचे साहित्य सर्वत्र वाचले जाते हे विशेष होय.

भौतिक सुखाच्या नादात वाचन संस्कृती मागे पडली असे वाटते परंतु संतांच्या ग्रंथांचे घरोघरी वाचन केले जाते. भौतिक सुधारणांनी माणसांना मनशांती मिळेल याची खात्री देता येत नाही. परंतु संतांच्या विचाराने माणसाला शांती मिळू शकते. तो समाधानाने जगत असतो. देशाचे चारित्र्य घडवण्याची शक्ती संत विचारामध्ये आहे.

संतांनी नेहमी दूरगामी विचार केला. एखादे मंदिर पडले तरी चालेल किंवा एखादी मशीद पडली तरी चालेल पण मानवतेचे मंदिर पडता कामा नये याची खबरदारी संतांनी घेतली. आज काही वाईट गोष्टी समाजात घडताना दिसतात. समाजात माणसांच्या बौद्धिक कामगिरीला जेवढी मोल मिळते तेवढी श्रमिकांच्या कष्टाला मिळत नाही. हे ओळखून काही माणसे कष्टासाठी हात चालवण्यापेक्षा लबाडीसाठी डोके चालवितात आणि बुद्धीच्या चातुर्याने समाजाची लूट करतात. तुकोबारायांनी अशा प्रवृत्तीला विरोध केला.

साधूचे सोंग घेऊन कित्येक धुर्त माणसांनी अध्यात्माचा गैरवापर केला. धर्माच्या सोज्वळ नावाखाली भक्तीची दुकाने थाटली. तसेच सामान्य माणसाच्या मनात नीती, धर्म, कर्म याविषयी दहशत निर्माण केली जाते. सर्वत्र बुवा, महाराजांचा सुळसुळाट झाला आहे. कपाळाला टिळा, गळ्यात मळा आणि अंगी मात्र नाना कळा अशी प्रवृत्ती वाढताना दिसते. संप्रदाय चांगला आहे, परंतु अशा लोकांनी तो विकृत केलेला दिसतो. अलीकडे साधुत्व हा अल्प भांडवली धंदा झाला आहे. सध्या सज्जन वागून सुख मिळेल याची खात्री नाही. परंतु दुष्कृत्य करून मजेत जगणारे अनेकजण आहेत. बेफिकीरपणे जगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नीती आणि तिची चाड न बाळगता या लोकांना स्वार्थ साधण्यात गैर वाटत नाही. अशा माणसांचे त्यांचे स्वतःचे तत्त्वज्ञान त्यांच्या सोयीची असते. अशा तत्त्वज्ञानावर जगणाऱ्या धूर्त व उन्मत लोकांच्यावर जरब बसवण्यासाठी सज्जनांची भक्कम फळी निर्माण करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *