बातमी

दलितमित्र एस .आर. बाईत यांचे सामाजिक कार्य चळवळीतील कार्यकर्त्यांना दिशादर्शक

सोनगे येथील प्रबोधन मेळाव्यात कॉ. संपत देसाई यांचे प्रतिपादन

मुरगूड ( शशी दरेकर) : दलितमित्र एस. आर. बाईत यांचे पन्नास वर्षातील सामाजिक कार्य नव्या दमाच्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उर्जा देणारे व मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन परिवर्तनवादी चळवळीतील जेष्ठ नेते कॉ. संपत देसाई (आजरा) यांनी केले.

ते सोनगे ता.कागल येथे गहिनीनाथ सहकार समूह व नवनिर्माण सामाजिक चळवळीच्यावतीने दलितमित्र एस. आर. बाईत यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याबदल सत्कार आणि गौरव अंक प्रकाशन व प्रबोधन मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापिठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील होते तर प्रमुख पाहूणे संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार (पुणे) हे होते. दलितमित्र बाईत यांचा सत्कार मानपत्र, मानाचा फेटा व श्रीफळ देवून ह.भ.प.सचिन पवार यांच्या हस्ते तर गौरव अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सचिन पवार म्हणाले, भारतीय संविधानाला ७० वर्षे पूर्ण झाली मात्र अनेक सामाजिक, प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. काही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी संघर्षाची गरज आहे. स्वतःचे घरदार, संसार वा-यावर सोडून समाजिक चळवळीत झोकून देऊन काम करणाऱ्या चळवळीतील कार्यकत्यांना. समाजाच्या पाठबळाची गरज आहे. पुरोगामी विचार फक्त ओठात असून चालत नाहीत तर तो कृतीत उतरावा. सामाजिक चळवळीत काम करण्यासाठी वयाची अट लागत नसल्याने प्रत्येकानी सामाजिक चळवळीत काम करणे गरजेचे आहे.

यावेळी जेष्ठ विचारवंत प्रा. राजाभाऊ शिरगुपे, आनंदराव पाटील, माजी महापौर मारुतराव कातवरे, एम. ए. नाईक, गजाननराव गंगापूरे, टी. एस गडकरी, उध्दव जांभळे, यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक गाहिनीनाथचे संपादक सम्राट सणगर यांनी केले. सूत्रसंचालन एम. एस. भोसले विकास सावंत यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार सुनिल डेळेकर, प्रविण सुर्यवंशी, दिलिप निकम, शशी दरेकर यांच्यासह कागल, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. आभार भिमराव कांबळे ( कुरणी) यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *