बातमी

कंजक्टिवायटिस : डोळ्यांची काळजी घ्या

सध्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक लोकांना डोळ्यांची साथ येत आहे. त्याचबरोबर डोळ्यांचा नवीन आजार समोर आला आहे, तो म्हणजे कंजक्टिवायटिस (Conjunctivitis). डोळ्यांची योग्य ती काळजी घेतल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास यामुळे होणाऱ्या दूरगामी समस्या टाळता येऊ शकतात. हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो. तसेच बॅक्टेरिया (व्हायरस) सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा आजार पसरतो. याबाबत जनतेने घाबरुन न जाता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

कंजक्टिवायटिसला पिंक आय (Pink Eye) असे देखील म्हणतात. कंजक्टिवा (नेत्रश्लेष्मला) म्हणजेच डोळ्याच्या पांढऱ्या भागावरती असलेल्या पातळ ऊतीची आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह होण्याची शक्यता असते. कंजक्टिवाइटिस हा डोळ्यांचा आजार कुणालाही होऊ शकतो. पण, लहान मुलांमध्ये हा आजार प्रामुख्याने जाणवू शकतो. यासाठी लक्षणे आढळल्यास आजारावर योग्य तो उपचार घेणे आवश्यक आहे.

कंजक्टिवायटिसची लक्षणे : कंजंक्टायवायटिस (नेत्रश्लेष्मला) वरती सूज येणे, डोळ्याचा पांढरा भाग किंवा पापणीचा आतील भाग लाल होणे, डोळ्यांची आग होणे आणि खाज सुटणे, धुसर दृष्टी आणि प्रकाशाप्रती संवेदनशीलता, डोळ्यातून स्त्राव येणे आदी.

कंजक्टिवायटिसचा प्रतिबंध करण्याकरिता सूचना- स्वच्छता राखणे जसे नियमितपणे हात धुवावे आणि डोळ्यांना सारखा हात लावणे टाळावे, टॉवल किंवा रुमाल: एकमेकांचा वापरु नये, उशीची खोळ नियमित पद्धतीने बदलावी, डोळ्यांची सौंदर्य प्रसाधने किंवा डोळ्यांची काळजी घेणाऱ्या वस्तू एकमेकांच्या वापरु नयेत.

कंजक्टिवायटिस झाल्यास कोणती काळजी घ्यावी- संपूर्ण विलगीकरणासह घरी राहून विश्रांती घ्यावी, ज्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल. आपला टॉवेल, रुमाल कुणालाही वापरायला देऊ नये. आपले कपडे वेगळे धुतले जातील याची काळजी घ्यावी, लक्षणे दिसून आल्यास स्वतःच्या मनाने औषध घेऊ नये. नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, संसर्ग जाण्यापर्यंत दररोज उशीची खोळ बदलावी. संसर्ग झालेला डोळा बोटाने चोळू नये. आवश्यक असल्यास टिशुचा वापर करावा. डोळ्यावर आवरण किवा डोळा झाकू नये, त्यामुळे संसर्ग बळावू शकतो.डोळ्यात धूळ जाण्यापासून किंवा काही जाण्यापासून जपावे त्यामुळे त्रास वाढू शकतो. आजारावर योग्य तो उपचार घेणे महत्त्वाचे असते यामुळे डोळ्याच्या पडद्याच्या संसर्गाची तीव्रता कमी होते आणि दृष्टीवर होणारी पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते. डोळ्यातून येणारा कोणताही स्त्राव स्टाईल वाईपच्या मदतीने पुसावा.
आरोग्य विभागामार्फत कंजंक्टिवायटिस आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • १. ज्या भागात डोळे येण्याची साथ सुरु आहे किंवा मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळुन येत आहेत, त्या भागात आरोग्य सेवकाच्या मदतीने घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.
  • २. पावसामुळे चिखल, घरगुती माशा किंवा चिलटाचा प्रादुर्भाव असणाऱ्या परिसरात ग्रामपंचायतीच्या सहकार्याने स्वच्छता आणि आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
  • ३. डोळे आलेल्या व्यक्तींनी जनसंपर्क कमी करण्याबाबत जनप्रबोधन करण्यात येत आहे.
  • ४. शाळा, वसतिगृहे, अनाथालय आदी संस्थात्मक ठिकाणी अशी साथ आल्यास डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत.
  • 5. सर्व आरोग्य संस्थेमध्ये कंजंक्टिवायटिस (Conjunctivitis) च्या उपचारासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध आहे.
  • ६. डोळे आलेल्या मुलांना बरे होईपर्यंत शाळा, कॉलेजमध्ये पाठवू नये.
  • ७. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

हा आजार एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे सहज पसरु शकतो. पण योग्य वेळेला निदान झाल्यास चिंता करण्यासारखे नाही. हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि स्त्राव संपर्काद्वारे फैलावू शकतो. जर तुम्हाला या संबंधित काही लक्षणे आढळल्यास वेळीच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अथवा सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *