संपादकीय

गुजरात साठी भाजपने दिला दिल्लीचा बळी ?

नुकत्याच झालेल्या गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लक्षणीय यश मिळवले. गुजरातच्या निवडणुकीत भाजपने जे एकतर्फी यश मिळवले आहे त्यामागे भाजपने गुजरातसाठी दिल्लीचा त्याग केला असे वाटत आहे. पण वास्तविक, प्रत्यक्षपणे काहीही म्हणता येत नाही. पण राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास हे वास्तव दिसते.

दिल्ली एमसीडीमध्ये आम आदमी पक्षाने यश मिळवले पण प्रत्यक्षात दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरला नव्हता. पीएम मोदींनी एमसीडीमध्ये कमळ फुलवण्यासाठी एकही सभा घेतली नाही. त्याचवेळी अमित शहा शेवटच्या क्षणी स्वतःच्या सभेला पोहोचले नाहीत.

दिल्लीची जबाबदारी फक्त राजनाथ सिंह, गौतम गंभीर आणि इतर नेत्यांवर होती. तर दुसरीकडे गुजरातमध्ये भाजपने कोणतीही कसर सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 हून अधिक सभा घेतल्या आणि राज्यातील 134 विधानसभा जागा कव्हर केल्या. त्यामध्ये त्यांचा अहमदाबादमधील 50 किलोमीटर लांबीचा विक्रमी रोड शो हे विशेष आकर्षण होते.

त्याचवेळी गृहमंत्री अमित शहा 23 रॅलींद्वारे 108 जागा कव्हर करताना दिसले. आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेले अरविंद केजरीवाल हे सुरुवातीच्या टप्प्यात गुजरातमध्ये दिसले होते. त्याच्या प्रचार सभेस जोर होता. त्यांनी वातावरण निर्मितीही केली होती. मात्र दुसर्‍या टप्प्याच्या मतदानापूर्वी त्यांचे हावभाव असे होते की त्यांनी गुजरातच्या राजकीय परिस्थिती समोर हात टेकले. विशेषता त्यांचा ‘फ्री’ चा फार्म्युला या निवडणुकीत दिल्ली आणि पंजाब प्रमाणे इफेक्ट टाकणार असे काही निवडणूक पंडित छातीठोकपणे सांगत होते. पण झाले मात्र उलटेच. गुजराती मतदारांनी फ्री ला नाकारले.

केजरीवालांनी आपले संपूर्ण लक्ष दिल्लीकडे वळवले. दुसरीकडे केजरीवाल यांची भूमिका पाहूनही भाजपने दिल्लीकडे लक्ष न देता गुजरातवर लक्ष केंद्रित केले. या सर्व पार्श्वभूमीवर नुकसान कोणाचे झाले असेल तर येथे फक्त काँग्रेसलाच नुकसान सोसावे लागले. प्रत्यक्षात गुजरात निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावत असलेल्या आम आदमी पक्षाला 13.2 टक्के मते मिळाली, तर भाजपला 53.5 टक्के मते मिळाली. येथे काँग्रेसची मतांची टक्केवारी केवळ 26.7 टक्के राहिली. जी 2017 च्या निवडणुकीत 41.4 टक्के होती. गुजरात मध्ये पटेल आरक्षण संघर्षाचा चेहरा असलेले हार्दिक पटेल हे भाजपमध्ये गेले. त्यांच्यामुळे पाटीदार समाजाची मते भाजपला मिळाली. तर पटेल बरोबर असणारे तरुण आप कडे वळले.

महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये का गेले याचे मुख्य कारणच भाजपला गुजरातची विधानसभा निवणुक जिंकण्यासाठी ही योजना आखली होती, त्यांनी गुजरातमध्ये रोजगारनिर्मितीसाठी महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवून नेले हा खूप महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले याची मोठी किंमत महाराष्ट्रातील जनतेला मोजावी लागणार हे मात्र नक्कीच.

गुजरात मधील विधानसभा निवडणूक असो की दिल्ली एमसीडी यात काँग्रेसलाच मोठा धक्का बसला. भाजप आणि आम आदमी पक्षापुढे काँग्रेस आता तिसरा पक्ष ठरल्याचे दोन्ही ठिकाणच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. एमसीडी तसेच गुजरातमध्ये काँग्रेसच्या केवळ जागाच कमी झाल्या नाहीत तर त्यांच्या मतांच्या टक्केवारीतही लक्षणीय घट झाली. याचे थेट कारण म्हणजे काँग्रेसकडे असा चेहरा नाही जो दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाला ताकद दाखवू शकेल. या निकालामुळे आपची राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.

एकंदरीत या सर्व खेळीमुळे परत एकदा अरविंद केजरीवाल हे भाजप ची बी टीम असले बाबत शंकेस पात्र झाले आहे. कारण मोदींना त्याच्या घराच्या मैदानात चितपट करायचे सोडून ते दिल्ली वाचवण्यासाठी गेले. त्यातून केजरीवाल यांच्या प्रतिभेवर शंका उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *