कसबा सांगाव : शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे कागल तालुक्यात दहा ठिकाणी कार्यक्रम घ्यायचे आहेत. त्याचा पहिला कार्यक्रम कसबा सांगाव येथे होत आहे. गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने काम करून उपक्रम यशस्वी करुया, असे आवाहन कागलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी केले. गुरुवारी (ता. २७) येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानासाठी जागेच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.
सहकारातील दीपस्तंभ स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त शाहू समूह, राजमाता जिजाऊ महिला समिती व राजे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबवण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समरजितसिंह घाटगे यांनी केले.
शेती व्यवसाय विद्यामंदिर कसबा सांगाव, आजी-माजी सैनिक भवन तसेच डी. एम. हायस्कूल येथे उपक्रम होईल. कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशीलकुमार संसारे, नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी, राजेंद्र माने, माजी सरपंच बाबासाहेब मगदूम, उपसरपंच प्रवीण माळी, प्रभू भोजे, विक्रमसिंह माने, बाळासो निंबाळकर, तलाठी दिगंबर पाटील, कोतवाल संजय बेडक्याळे, ग्रामविकास अधिकारी अण्णाप्पा कुंभार आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.