कोल्हापूर, दि. 22: अनुसूचित जातीमधील बहूतांश व्यक्ती ह्या शेतमजूर किंवा लहान शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवून त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणणे अत्यंत कठीण जाते. ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याच्या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळा या अनुसूचित जाती व नवबौध्दांची संख्या, साक्षरतेचे प्रमाण आणि आवश्यकता विचारात घेऊन सुरू करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळांमध्ये इच्छुकांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, विशाल लोंढे, यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हयामध्ये एकूण चार शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. माहे मार्च, 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये या चारही शाळांचा निकाल 100 टक्के लागलेला आहे.
सर्व शासकीय निवासी शाळांमध्ये मोफत स्वच्छ पाणी, दैनंदिन भोजन चांगल्या प्रतीचे, सकस व विहीत इष्टांकाप्रमाणे दिले जाते. तसेच पलंग, गादी, उशी, उशी कव्हर, बेडशिट, चादर, ब्लँकेट इत्यादी वस्तु दिल्या जातात. त्याचबरोबर वहया, पुस्तके, स्टेशनरी इत्यादी साहीत्यही मोफत दिले जाते. तसेच सर्व प्रवेशीतांची आरोग्य तपासणी वर्षातून दोनदा करण्यात येते.
अधिक माहीतीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारेमाळ, तसेच संबंधीत शासकीय निवासी शाळांचे मुख्याध्यापक यांचेशी संपर्क साधावा.