लेख

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव…!

कृषी क्षेत्राशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे जिल्हा कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे. शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करुन ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळवून देणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्यानांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी तसेच बाजाराभिमुख कृषी उत्पादनाला आणि विपणनाला चालना देण्यासाठी राधानगरीसारख्या डोंगराळ, दुर्गम भागात घेण्यात आलेला जिल्हा कृषी महोत्सव सर्वसमावेशक, नाविन्यपूर्ण आणि बळीराजाला मार्गदर्शक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील भुदरगड, राधानगरी, आजरा यासारख्या डोंगराळ तालुक्यात शेतीमध्ये उत्पादकता कमी आढळून येते. या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी तसेच शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज ओळखून पश्चिम घाटातील नैसर्गिक वारसा लाभलेल्या राशिवडे गावात कृषी महोत्सव होत आहे. या माध्यमातून कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याबरोबरच शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची संधी मिळवून देण्यात आली आहे. तसेच शासनाच्या विविध कृषी योजना, उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण, प्रयोगशील शेतक-यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन, कृषी प्रदर्शन आणि अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंतांची भेट, चर्चा व कृषी विषयक परिसंवाद, यातून शेतक-यांचे शंका निरसन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारीत धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव या कृषी महोत्सवांतर्गत होत आहे. बळीराजाला आवश्यक असणारं ‘सारं काही एकाच छताखाली’ आणण्यात आलेला हा कृषी महोत्सव वैविध्यपूर्ण आणि स्तुत्य उपक्रम आहे.

मार्गदर्शनपर कार्यक्रमांवर भर- जिल्हा कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम होत आहेत. ऊस उत्पादकता वाढ अभियान अंतर्गत अधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण, कृषी उत्पादकतेबाबत मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मिलेट बाईक रॅली आणि मिलेट वॉक रॅली, एकच ध्यास, खेड्यांचा विकास या धर्तीवर सरपंच परिषदेचे व महिला परिषदेचे आयोजन, मुठ्ठी भर मिलेट, हर घर मिलेट, हर मुठ्ठी मिलेट – पौष्टिक तृणधान्याचा प्रचार आणि प्रसार, सहकार परिषदेचे आयोजन, विविध सहकारी साखर कारखान्यांचे पदाधिकारी, विविध दूध संघांचे प्रतिनिधी, ग्रामीण भागातील छोट्या छोट्या दूध संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, सचिव यांच्या मदतीने सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील दरडोई उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे.

विविध विभागांचा सहभाग- कृषी विभागाच्या वतीने आयोजित या कृषी प्रदर्शनात कृषी विभागासह जिल्हा परिषद, सर्व शासकीय महामंडळे, शिक्षण विभागासह विविध विभाग सक्रिय सहभागी झाले आहेत. प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा तसेच प्रदर्शन स्थळी रांगोळी आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

200 स्टॉल्सची उभारणी- कृषी तंत्रज्ञान, निविष्ठा, धान्य महोत्सव, शेतमाल विक्री, सिंचन सुविधा, गृहपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ उभारणी असे एकूण सुमारे 200 स्टॉल्सची उभारणी या महोत्सवात केली. . यात 40 शासकीय स्टॉल, 30 कृषी निविष्ठा स्टॉल, 30 सिंचन सुविधा आणि तंत्रज्ञान स्टॉल, 20 खाद्यपदार्थांचे स्टॉल, गृहोपयोगी वस्तूंचे 40 स्टॉल, 10 अवजारांचे स्टॉल तर धान्य महोत्सव, मिलेट, सेंद्रिय शेती व इतर 30 स्टॉल लावण्यात आले आहेत.

विविध उपक्रम- कृषि प्रदर्शन, परिसंवाद / चर्चासत्रे, सेंद्रिय धान्य महोत्सव (उत्पादक ते ग्राहक थेट विक्री), विक्रेता खरेदीदार संमेलन, शेतकरी व कर्मचारी सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर भर- शेती औजारे, हरितगृह, बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन, रेशीम विकास, मत्स्योद्योग, अॅक्वाकल्चर, दुग्धव्यवसाय व डेअरी, साठवणूक तंत्रज्ञान प्रक्रिया व पॅकेजिंग, अपारंपरिक ऊर्जा, मार्केटींग तंत्रज्ञान, शेती व्यवसाय तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान,विविध कृषि विषयक तंत्रज्ञान प्रात्यक्षिके व मॉडेल्स, जमीन आरोग्य पत्रिका, माती व पाणी परीक्षण, भात लागवडीचा सुळकुड पॅटर्न, आदर्श गाव, पाणलोट व्यवस्थापन, फळबाग लागवड, नाडेप व गांडूळ युनिट, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, किचन गार्डन, शेत तळ्यातील मत्स्यपालन, अॅझोला उत्पादन, विदेशी भाजीपाला, शेतकरी अपघात विमा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, टिशू कल्चर, किटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी, फळप्रक्रिया, व्हर्टीकल गार्डन आदी बाबींची माहिती देण्यात येत आहे.

विविध शेती उत्पादने- पौष्टिक तृणधान्य महोत्सव, खाद्य महोत्सव,आजरा घनसाळ, पॉलिश्ड व हातसडी तांदूळ,जांभूळ, करवंदे, फणस इ. रानमेवा, कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, सेंद्रिय नाचणी, सेंद्रिय हळद बांबूपासून तयार केलेली उत्पादने, सेंद्रिय ताजी फळे व ताजा विषमुक्त भाजीपाला उत्पादनांचा महोत्सव या ठिकाणी आहे. तसेच किटकनाशके, ठिबक सिंचन, यंत्रे व औजारे तसेच विविध कंपन्यांची खते, किटकनाशके, ठिबक सिंचन, यंत्रे व औजारे तसेच विविध कंपन्यांची खते यांचे प्रदर्शन आहे.

शासकीय व निमशासकीय दालनेविविध शासकीय विभाग योजनांच्या महितीसह सहभागी झाली आहेत. तसेच कृषि विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषि विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर, सहकार विभाग, महसुल, समाजकल्याण, आरोग्य, मत्स्य व्यवसाय, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन, रेशीम विकास, महाऊर्जा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, फलोद्यान प्रशिक्षण केंद्र तळेगाव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, मुंबई ,महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर,स्मार्ट प्रकल्प, नाबार्ड, अपेडा, जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडीया, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, कोल्हापूर, खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर,नॅशनल सीड कॉर्पोरेशन, पुणे एमएआयडीसी, कोल्हापूर आदी विभाग सहभागी झाले आहे.

कृषि प्रदर्शनाचे विशेष आकर्षण15 किलो वजनाचा फणस, पाच किलो वजनाचा कोबी, 8 किलो वजनाचा मुळा, साबुदाणा कंद, परदेशी भाजीपाला, जातीवंत जनावरांसह पुंगनूर जातीची केवळ तीन फूट उंचीची गाय, दुर्मीळ होत चाललेल्या माडग्याळ जातीचा मेंढा या गोष्टी प्रदर्शनात आकर्षण ठरत आहेत. धान्य महोत्सवात आजरा घनसाळ, इंद्रायणी, रत्नागिरी 24 तांदूळ, नाचणी, वरी, सेंद्रिय गूळ खरेदीसाठी गर्दी होत आहे. तसेच महिला बचत गटाच्या उत्पादने व खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हेक्टरी 125 टन ऊस उत्पादकता वाढ दालनात ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान जसे सुपर केन नर्सरी, ठिबक सिंचन, पाचट व्यवस्थापन, हुमणी नियंत्रण आणि आंतरपिके एकाच दालनात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान, शासकीय फळ रोपवाटीकेतील दर्जेदार विविध फळरोप कलमे शासकीय दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घोंगडी, चप्पल बनविणे, मिठाई बनविणे, कुंभार काम, बांबू उद्योग, बुरुड काम अशा परंपरागत उद्योगांना विशेष स्थान देण्यात आले आहे. देशी बियाणे, वैशिष्ट्यपूर्ण पिकांचे नमुने पपईची चेरी, काळाभात, काजूबोंडे, जरबेरा, झुकीनी, काजू, सकेंश्वरी मिरची, ऊस, गुलाब इ. चे नमुने या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील बळीराजाला शेती व शेतीपूरक व्यवसायासंबंधी ‘सगळं काही एकाच ठिकाणी’ देण्याचा पूरेपुर प्रयत्न जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागासह सर्व विभागांनी केला आहे. नाविन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्वसमावेशक जिल्हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी निश्चितच महत्वपूर्ण ठरेल…!

वृषाली पाटील,
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय,
कोल्हापूर
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *