रील बनवा अन् २५ हजारांचे बक्षीस जिंका!

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत कोल्हापूरातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर (जिमाका) : माती आणि पाण्याच्या संवर्धनावर भन्नाट रील बनवा आणि जिल्हास्तरावर २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जिंका ! मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने १५ ते २१ ऑगस्ट या जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेच्या माध्यमातून Instagram च्या माध्यमातून मृद व जल संधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Advertisements

स्पर्धेसाठी सहभागी युवकांनी ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करून ती स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, सहभागीचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक असून, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे तसेच #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.

माती संवर्धन, पाणी बचत, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी जलसंधारण कामे, पारंपरिक पद्धती आणि माती-पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना आदी विषयांवर रील तयार करता येणार आहे.

Advertisements

‘एक Reel… मातीसाठी!, एक Reel… पाण्यासाठी!, एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी!’ हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे.

रील्सचे परीक्षण विषय व संदेश – ३० गुण, कल्पकता – २५, प्रभावी सामाजिक संदेश – २०, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता – १५ आणि Instagram Engagement – १०, अशा एकूण १०० गुणांवर करण्यात येणार आहे. केवळ Likes किंवा Followersच्या आधारे विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement यांचा समतोल साधून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व गौरवचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह देण्यात येणार असून पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

विजेत्यांचा ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून विशेष गौरव करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांनी आपल्या कल्पकतेला डिजिटल व्यासपीठ देत जास्तीत जास्त रील्स तयार करून या जनजागृती अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!