मुरगूड (शशी दरेकर) : कागल तालुक्यातील यमगे आणि मूरगुड येथे बंद घर हेरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी तिजोरी फोडत साडेसात लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यमगे येथील महादेव दत्तात्रय लोकरे यांच्या भाऊबंदांच्या घरी पुणे येथे लग्नसमारंभ असल्याने सर्व शेजारी लग्नासाठी पुणे येथे गेले होते.

दरम्यान लोकरे दांपत्य आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यांची मुले शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. घर सलग दोन दिवस बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून ही चोरी केल्याची चर्चा गावात सुरू आहे.
चोरट्याना लोकरे यांच्या घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून सोन्याचे गंठन, चेन, लक्ष्मीहार, चांदीची भांडी व साहित्य तसेच ६० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ७ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरीची माहिती मिळताच लोकरे दांपत्य घरी परतले.आयुष्यभर कष्ट करून जमवलेले सोन्याचे दागिने आणि बचतीची रक्कम एका क्षणात नाहीशी झाल्याचे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले.

या घटनेमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे. मुरगूड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. बंद घरांवर पाळत ठेवून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे का? याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान मुरगूड येथील के. डी. चौगुले हे बाहेरगावी गेले होते .त्यांच्या बंगल्या मधील सी सी टीव्ही, डी व्ही आर चोरट्यांनी लंपास केला त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य विस्कटून ठेवले होते. त्याच्या घरातून अंदाजे १० हजार रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे. दागिने लॉकर मध्ये ठेवल्यामुळे वाचल्याचे चौगले यांनी सांगितले. २० ते २२ जून दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.