गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : नेर्ली गावातील नेर्ली-विकासवाडी रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या बाजूचे काम वेगाने सुरू आहे.
मात्र, याच कामादरम्यान दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या खोदकामामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा (मेन व्हॉल्व्ह) मोठा तोटा झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे, परिणामी परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

जलवाहिनीतील गळतीमुळे पुढील गल्लीतील घरांना कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यामुळे अनेक नागरिक गळती झालेल्या ठिकाणी येऊन पाणी भरण्यास मजबूर झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. ऐन कामाच्या वेळी पाणीटंचाईमुळे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन तुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत नागरिकांना या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.