मुरगूडमध्ये शिवतीर्थ येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : पश्चिम महाराष्ट्रातील  शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून ख्याती मिळवलेल्या मुरगूड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शिवप्रेमी व संयुक्त मुरगूडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे यंदाचे पाचवे वर्ष असून दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थाला मानाचे तोरण बांधण्यात आले. तसेच छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या काशिलिंग बिरदेव मंदिरातून पारंपरिक मशाल आणण्यात आली. यानंतर गोंधळी बांधवांच्या उपस्थितीत भव्य गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला.

Advertisements

मुख्य दिवशी ग्रामदैवत अंबाबाई मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा विधिवत राज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्ष सुहासिनीदेवी पाटील, उपनगराध्यक्ष रेखा मांगले, सर्व नगरसेवक-नगरसेविका, नगरपालिका कर्मचारी, संयुक्त मुरगूडकर तरुण व असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

राज्याभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य वैभव स्वामी यांनी सहकाऱ्यां समवेत केले. सुमारे अर्धा तास वेदमंत्रांच्या गजरात हळद, कुंकू, पंचामृत, दूध आदींच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला होता.

दरम्यान, राज्याभिषेक दिनानिमित्त रात्री भव्य लेसर शो, आकर्षक आतिषबाजी व साऊंड ब्लास्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवप्रेमींमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!