मुरगुड (प्रतिनिधी) : सनातनी विचाराचा उद्रेक देशभर घोंगावत असून देशाचं भविष्य अंधकारमय होत आहे, अशावेळी शहीद डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या विवेकी विचाराची देशाला गरज निर्माण झाली आहे असे मत कॉ.शिवाजी राऊत सातारा यांनी व्यक्त केले.
ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुरगुड शाखेच्या वतीने भडगाव येथे आयोजित केलेल्या ‘ कार्यकर्ते व युवक मेळाव्यात ‘ प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै सुशीला मगदूम ग्राम वाचनालयाचे अध्यक्ष हिंदुराव सोनालकर होते. कॉ राऊत पुढे म्हणाले,डॉ नरेंद्र दाभोलकर सर्वाना सोबत घेऊन जाणारे कोणत्याही विपरीत गोष्टीचा राग न करता संयमाने विचारपूर्वक प्रतिवाद करणारे विवेकवादी विचारवंत होते.या वेळी त्यांच्या विविध विधायक व संघर्षात्मक कार्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्याचे सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी गावातील प्रगतशील शेतकऱ्यांचा फळझाडे देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रा प्रवीण जाधव सर,अशोकराव शिराळे,कृष्णात कांबळे,पी आर पाटील सर,आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.सिद्धार्थ कांबळे आनुरकर याना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
प्रारंभी शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास शाखेचे विक्रमसिंह पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे,प्रधान सचिव प्रदिप वरने,स्मिताताई कांबळे,प्रधान सचिव सारिका पाटील, नंदकुमार पाटील,ताटे सर,ग्रंथपाल मधुकर सुतार,संजय कांबळे,पी एस पाटील,दत्तात्रय कांबळे यांचेसह परिसरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते.
स्वागत शाखेचे कार्याध्यक्ष शंकरदादा कांबळे यांनी केले,प्रास्ताविक भीमराव कांबळे यांनी केले.सूत्रसंचालन सचिन सुतार यांनी केले तर आभार समाधान सोनालकर यांनी मानले.