कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष सन 2022-23 साठी महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनुसुचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज महाडिबीटी पोर्टलवर दि. 31 जुलै पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक वर्षाचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये बराच कालावधी उलटून गेला असला, तरीही जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्ती/फ्रिशिपचे अर्ज महाडिबीटी प्रणालीवर भरलेले नसल्यास अशा अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गामधील सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 31 जुलै 2023 रोजी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावेत.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणाऱ्या अर्जांची पडताळणी करुन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवण्याची दक्षता द्यावी. महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामार्फंत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत, असे ही त्यांनी नमूद केले आहे.