मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ग्रामीण रुग्णालयात परिसरातील ३० ते ४० गावचे रुग्ण येतात पण या रुग्णालयात सुविधांची वाणवा आहे . त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी मुरगूडमधील माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे कि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ भूलतज्ञ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर्स नाहीत सोनोग्राफीची सोय नाही तसेच भौतीक सुविधांचा अभाव आहे त्यामुळे गैरसोयीचे आगार म्हणजे हे ग्रामीण रुग्णालय झाले आहे . रुग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होते प्रसंगी रुग्ण दगावण्याचेही प्रकार घडत आहेत याची गांभीर्यपूर्वक दखल घेवून कार्यवाही करावी . कार्यवाही लवकर न झाल्यास आंदोलनाचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यासंदर्भात शिवसेना युवा सेनेचे निरीक्षक विरेंद्र मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सीपीआर रुग्णालयाच्या सिव्हील सर्जन डॉ सुप्रिया देशमुख यांनाही निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले माजी नगरसेवक एस.व्ही. चौगले, दत्तात्रय मंडलिक किरण गवाणकर, दिपक शिंदे, राजू कांबळे अक्षय शिंदे’ शशिकांत पाटील आदिंचा समावेश होता.