डॉ. प्रदीप काळबर यांना सांडपाणी व्यवस्थापनासाठी भारतीय पेटंट

कागल (प्रतिनिधी) : कागलचे सुपुत्र तथा डॉ. प्रदीप काळबर यांना शहरांतील सांडपाणी प्रदूषण समस्येवर प्रभावी उपाय सुचविणाऱ्या नवकल्पनेसाठी भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे. सध्या ते आयआयटी मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Advertisements

        डॉ. काळबर यांनी विकसित केलेली ही प्रणाली बहुस्तरीय सांडपाणी प्रक्रिया आराखड्यावर आधारित असून त्यामध्ये विविध स्तरांवर अनेक भूवापरांचा समावेश करण्यात आला आहे. या नवकल्पनेमुळे सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापरासाठी लागणारी जागा तसेच ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. शहरी पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisements

         या संशोधनाचा वापर शहर आणि महानगरपालिका प्रशासनाने केल्यास जलप्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाय उपलब्ध होणार आहेत. प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वितरणासाठी मोठे जाळे उभारण्याची गरज कमी होईल तसेच ग्राहकांच्या जवळच प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. यामुळे अतिशय मोठे किंवा अतिशय लहान सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता कमी होऊन शाश्वतता वाढण्यास मदत होईल.

      याशिवाय, शहरांतील जागेची बचत, ऊर्जा खर्चात कपात आणि जलसुरक्षा मजबूत करण्यासही या प्रणालीचा फायदा होणार आहे. स्थानिक पातळीवर पाणी निर्मिती शक्य होत असल्याने हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ही प्रणाली अधिक सक्षम आणि लवचिक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!