कागल प्रतिनिधी : श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस मोठ्या प्रमाणात भरवण्याचे नियोजन उरूस कमिटीने केले आहे. यामध्ये विविध कार्यक्रम करण्याचे ठरले आहे. या वर्षी बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात घेण्याचे नियोजन होते. तथापि, लम्पी या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आणि जनावरांसंबंधित कायद्यान्वये उरुसामध्ये बैलगाडी शर्यती घेण्यास प्रांताधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे यंदा बैलगाडी शर्यती नसल्याने शौकिनांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.
कागल नगरीतील गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस रविवारी (दि. ५) ते मंगळवारी (दि. २० नोव्हेंबर) या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्याविषयी सर्वपक्षीय सभेमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (दि. १९) रोजी कागल तालुक्यातील सांगाव माळ येथे सकाळी ९ ते २ या वेळेत बैलगाडी शर्यत, घोडागाडी शर्यत, बकऱ्यांच्या टकरी इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत निर्णय उरूस समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार उरूस समितीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर मागणी केली होती.
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व महाराष्ट्र शासन अधिसूचना १७ जून २०२२ अन्वये लम्पी चर्मरोग या रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. गोजातीय प्रजातीची गुरे यांचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे, यास मनाई करण्यात आलेली आहे. याविषयीच्या याआधी दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
उरूस काळात बैलगाडी शर्यत, घोडागाडी शर्यत, बकऱ्यांच्या टकरी कार्यक्रमास परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी उरूस समितीचे अध्यक्ष रणजित पाटील यांना कळविले आहे.