२२ किलो गांजासह तिघांना अटक, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर: करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल २२ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गांजा, एक चारचाकी, एक दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण १२ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तलावाजवळ रचला सापळा : जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथके तयार केली आहेत. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे आणि अंमलदार वैभव पाटील यांना उजळाईवाडी परिसरात काही तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उजळाईवाडी येथील तलावाजवळ सापळा रचला.

अशी झाली कारवाई : दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी आलेल्या राजकिरण मोरे या तरुणाला पोलिसांनी सर्वात आधी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याचे साथीदार संतोष माने (रा. ढेबेवाडी) आणि सोमनाथ मंडले (रा. पाटण) यांच्याकडेही मोठ्या प्रमाणावर गांजा असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून आणखी २० किलो गांजा जप्त केला. या संपूर्ण कारवाईत साडेचार लाख रुपये किमतीचा एकूण २२ किलो गांजा, वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी व दुचाकी वाहने आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले.
या पथकाने केली कारवाई : पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार वैभव पाटील, संतोष बरगे, शिवानंद मठपती, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, विशाल खराडे, सतीश सूर्यवंशी, संजय हुंबे आणि अमित मर्दाने यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या धडक कारवाईमुळे कोल्हापूर परिसरातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.