मुंबई: राज्यात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस किंवा नववर्षाच्या सुरुवातीला या निवडणुका पार पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्यातील सुमारे १२ हजार ग्रामपंचायती, २० जिल्हा परिषदा, २१ पंचायत समित्या आणि १०५ नगरपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष पुनर्तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
या आगामी निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निर्णय आल्यानंतरच अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असले, तरीही राज्यातील राजकीय पक्षांनी मात्र आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.
निवडणुका जवळ येत असल्याने विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारही सक्रिय झाले असून, त्यांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.