बातमी

कागल शहरात शिवजयंतीच्या मिरवणूकांचा जल्लोष

कागल, दि. ३: कागल शहरात विविध मंडळांनी साजऱ्या केलेल्या शिवजयंतीच्या मिरवणूकाचा अमाप उत्साह होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. शिवजयंती उत्सवाच्या या जल्लोषात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही समरस झाले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही झाले शिवजयंतीच्या जल्लोषात समरस……

सुरवातीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंबी गल्ली येथील के. बॉईज मंडळाच्या शिवजयंती उत्सवात उपस्थिती लावून श्री. शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ संचलित एफसी तालीम मंडळाच्या शिवप्रतिमेला त्यांनी अभिवादन केले. येथील संयुक्त कोष्टी गल्ली तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवात सहभागी होत, त्यांनी फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरवर प्रतिष्ठापणा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या मंडळाच्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले. येथे आयोजित केलेल्या पारंपारिक दांडपट्टा व भालाफेक खेळातही मंत्री श्री. मुश्रीफ सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघे कागल शहर झाले शिवमय……!

त्यानंतर बसस्थानकाजवळच्या स्टॅन्ड सर्कल मित्र मंडळाच्या शिवजयंती उत्सवात मंत्री मुश्रीफ सहभागी झाले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच तिथे आयोजित केलेल्या मल्लखांब खेळाच्या खेळाडूंनी मंत्री मुश्रीफ यांना सलामी दिली. येथे आयोजित केलेल्या ढोल-ताशाच्या निनादात मर्दानी खेळातही मंत्री श्री. मुश्रीफ समरस झाले. तसेच हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकातील शिवसम्राट तरुण मंडळाच्या श्री. शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. या मंडळाच्या सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अभिवादन केले.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक बाबासो नाईक, संजय चितारी, रणजीत बन्ने, आदी प्रमुखांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कार्यकर्त्यांसमवेत मुश्रीफही थिरकले………”
बसस्थानकाजवळच्या स्टॅन्ड सर्कलच्या मिरवणुकीत येताच कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफ यांना उचलून खांद्यावर घेतले. या जल्लोषी मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव “दैवत छत्रपती…..” या शिवभक्तीच्या गाण्यावर मंत्री श्री.मुश्रीफ, प्रताप उर्फ भैय्या माने हे मान्यवरही कार्यकर्त्यांसमवेत थिरकले.

कागलमधील विविध मंडळांनी श्री. शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या मिरवणूकाकांचा हा अमाप सळसळता उत्साह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *