कोल्हापूर : कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये लॉज मालक, मॅनेजर, कामगार आणि दोन ग्राहकांचा समावेश आहे. 31 जानेवारी 2025 रोजी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कागल शहरातील कसबा सांगाव रोडवरील आदिती बार अँड लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लॉजचा मालक संजय यल्लाप्पा दौलतकर, मॅनेजर श्रीरंग उर्फ बट्टु जाधव, कामगार लक्ष्मण नामदेव शिरोळे आणि ग्राहक राहुल भाऊसाहेब पाटील यांचा समावेश आहे. यासोबतच, पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली.
पोलिसांनी घटनास्थळावरून 50 हजार रुपये किमतीची एक टीव्हीएस जुपिटर मोपेड, 3 हजार रुपये रोख रक्कम आणि 41 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल हॅन्डसेट जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करत आहेत.