शेळ्यामेंढ्याचा बाजारही ओढा पात्रात आणा –सादिक खाटीक यांची मागणी
आटपाडी (प्रतिनिधी ) : रहदारीला अडथळा न करता शनिवारचा आटपाडीचा सर्व बाजार, ओढा पात्रातील रस्ता सोडून लगतच्या दुतर्फा विस्तीर्ण ओढा पात्रातच भरवावा, तसेच शेळ्यामेंढ्याचा बाजारही ओढा पात्रातच पुर्ववत आणावा . असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केले आहे.
आटपाडीचा शनिवारचा बाजार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह पुणे, मुंबई, कोकणा बरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलगंणा, गोवा वगैरे राज्याचे आकर्षण बनला आहे . शेकडो वस्तु, पदार्थ, भाजीपाला, फळ फळवळ, धान्ये, कडधान्ये, शेळ्यामेंढ्या वर्गातील सर्वच प्रकारची जनावरे, स्टेशनरी, कटलरी, किराणा, हार्डवेअर, शेती उपयोगी सर्व औजारे वस्तू असे शेकडो प्रकारच्या प्रचंड गोष्टींनी खचाखच भरणारा बाजार सध्या ताळतंत्र सुटल्यासारखे अस्ताव्यस्त भरत असल्याने सर्वांच्याच त्रासाचे ठरत आहे .
सुमारे ९० मीटर विस्तीर्ण ओढापात्राच्या मधूनच बाजार पटांगण ते आटपाडी स्टॅन्ड कडे जाणारा रस्ता या बाजारासाठी वापरात आणला जातो . तथापि ३० फुटी रस्त्याकडेला दोन्ही बाजुला रस्त्यावरच या प्रचंड बाजाराचा बाजार मांडला जात असल्याने बाजारसाठी येणारे जाणारे लोक, बेहिशोबी वाहने, विद्यार्थी यांच्या प्रचंड गर्दीने हा रस्ता कमालीचा व्यस्त आणि त्रस्त बनत आहे . याच्याकडे ना नगर पंचायत प्रशासनाचे लक्ष आहे, ना मार्केट कमिटीचे पदाधिकारी काही उपाययोजना करायला तयार आहेत . छोटे मोठे दुकानदार, भाजीवाला वगैरे सर्वप्रकारचे विक्रेते यांची या बाजारातील संख्या हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे.
या बाजारसाठी येणाऱ्या बाजारकऱ्यांची संख्याही हजाराच्या पटीत आहे . बाजार पटांगणा लगतच्या श्रीराम कॉलेज कडे जाणाऱ्या पुलापासून अंबामाता मंदिराला वळसा घालून साईबाबा मंदिराच्या ओढ्यातील मोठ्या पुलापर्यत ओढा पात्राची प्रचंड विस्तीर्ण जागा आहे . या सर्व विस्तीर्ण ओढा पात्राचा सर्व अतिक्रमणे काढून यथायोग्य उपयोग करण्याचे ठरविल्यास आटपाडीच्या सध्याच्या बाजाराच्या चार पट मोठा बाजार येथे भरविला जावू शकतो.
या ओढा पात्रातून अगदी २०० फुटी रस्ता काढून आणि ठराविक अंतराने या ओढा पात्राच्या दोन्ही कडेला जोडणारे अनेक रस्ते काढून दोन चार हजार विकेत्यांना – प्रचंड संख्येतल्या बाजारकऱ्यांना सामावणे सोयी सुलभ होवू शकते. या बाजारासाठी रस्त्याकडेला ५० फुटाचे अंतर सोडून दोन्ही बाजूंनी मोकळ्या ढाकळ्या चार चार लाईनच्या माध्यमातून हा बाजार उत्तम प्रकारे पार पडू शकतो . विस्तीर्ण ओढा पात्रातले सर्व खाच खळगे, अतिक्रमणांना जमीनदोस्त करून या नव्या पेठेतून वाहनेही सोयी सुलभपणे वावरू शकतील अशी व्यवस्था साकारू शकते.
ठराविक अंतरावर कचरा कुंड्या, शौचालय, मुताऱ्या , सर्वच बाजार सभामंडपा सारख्या आच्छादनाखाली आणल्यास उन, वारा, पाऊस यापासून सर्वाचे संरक्षण आणि प्रचंड सोयीचे होऊ शकते . पावसाळ्यात ओढ्या पात्राच्या दुतर्फा परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ओढ्याच्या एका बाजूने २५ फुटी उघडा कॅनाल काढल्यास बाजारच्या व्यवस्थेस पाण्याचा अडथळा येणार नाही . त्या दृष्टीने नियोजन झाले पाहीजे . गावठाण समजत दामटून शासकीय पैशातून ओढ्यात साकारलेली अतिक्रमणे ही दूर केली गेली पाहीजेत.
शनिवारीच भरणाऱ्या प्रचंड अशा शेळ्या,मेंढ्या, बोकडे, बकरे ,पाटी, लाव्हर यांच्या बाजारासाठी खाटीक, दलाल, हेडे, व्यापारी, शेळ्यामेंढ्या, पालक, शेकडो शेतकरी प्रचंड संख्येने आटपाडीकडे धाव घेतात . शेकडो वाहने या व्यवसायासाठी धावत असतात सुमारे २५ हजार लहान जनावरांची आवक असलेला आटपाडीचा शेळ्यामेंढ्याचा बाजार आटपाडी ओढ्याच्या विस्तीर्ण पात्रातील प्रचंड मोठ्या मोकळ्या जागेमुळे नावारूपास येण्यास कारणीभूत ठरल्याचे सर्वश्रूत आहे.
सदरचा शेळ्यामेंढ्याचा बाजार मार्केट यार्डातील बंदिस्त, अपुर्या जागेत हलविल्याने आणि तिथेही तो दोन विभागात विभागून भरवला जात असल्याने या बाजारावर तसेच या ओढ्या पात्रातील इतर बाजारावर प्रतिकुल परिणाम जाणवू लागला आहे . मोठ्या जनावरांच्या आजाराच्या भीतीने शेळ्यामेंढ्याचा मार्केट यार्डातील हा बाजार कालच्या शनिवारी ( दि. १७ सप्टें . ) प्रशासनाने बंद ठेवल्याने शेतकरी पशुपालक व्यापारी यांनी मार्केट यार्डा पुढील राजमार्ग रस्त्यावरच बाजार मांडून रहदारीला प्रचंड अडथळा केलाच शिवाय प्रशासनालाही गप्प बसविले . आता हा शेळ्यामेंढ्याचा बाजार प्रशासन किती आठवडे बंद ठेवते हे सध्यातरी अनभिज्ञ आहे.
आटपाडी तालुक्याच्या अर्थकारणाची जणू लाईफ लाईन बनलेला आटपाडीचा शेळ्या मेंढ्यांचा हा बाजार पुन्हा आटपाडीच्या बाजार पटांगणा लगतच्या विस्तीर्ण ओढा पात्रात बसवावा किंवा श्री . अंबामातेच्या मंदिरालगतच्या खादी भांडारा समोरील विस्तीर्ण ओढापात्रात हा बाजार भरवून सर्वांना आनंदाचा प्रत्यय बाजार समितीने आणून द्यावा . असे ही शेवटी सादिक खाटीक यांनी आवाहन केले आहे .