मुरगूड ( शशी दरेकर ) – “दुसऱ्यांनी लिहून दिलेल्या पत्रकावर सही करता आली म्हणजे गोकुळचा कारभार समजला असे होत नाही. त्यांना गोकुळच्या कारभाराची इतकीच माहिती आहे तर सभेच्या दिवशी समोर येऊन आमच्या फक्त चार प्रश्नांची उत्तरं त्यांनी सर्वांसमोर द्यावीत. उगीच फूटपट्टी घेऊन आभाळाची उंची मोजायचा प्रयत्न श्रीमती अंजना रेडेकर यांनी करू नये. ” अशी खरमरीत टीका गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील मुरगूडकर यांनी केली आहे.
गोकुळची सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट रोजी कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे आहे. सभेच्या ठिकाणावरुन विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी आघाडीवर टीकास्त्र सोडले. महाडिकांच्या टीकेला सत्ताधारी आघाडीकडून संचालिका अंजना रेडेकर यांनी सडतोड जवाब दिला. त्यानंतर विरोधी आघाडीकडून माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी सत्ताधारी आघाडी व संचालकावर निशाणा साधला.
उगीच फूटपट्टी घेऊन आभाळाची उंची मोजायचा प्रयत्न करू नका
पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, “ शौमिका महाडिक यांना प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्यांनी लिहून दिलेल्या कागदावर सही करून संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. माझं त्यांना एकचं सांगणं आहे की, त्यांना गोकुळच्या कारभाराची इतकीच माहिती आहे तर सभेच्या दिवशी समोर येऊन आमच्या फक्त चार प्रश्नांची उत्तरं त्यांनी सर्वांसमोर द्यावीत. शौमिका महाडिक यांना प्रत्युत्तर देणं एवढीच काय ती श्रीमती रेडेकर यांची संचालिका म्हणून जबाबदारी दिसते. त्याव्यतिरिक्त संचालिका म्हणून वर्षभरात दूध उत्पादकांच्या हिताची भूमिका मांडताना श्रीमती रेडेकर कधी दिसल्या नाहीत.
त्या पत्रकात म्हणतात की, कसबा बावडा याच जिल्ह्यातील गाव आहे. त्यांची स्मरणशक्ती कमी असेल तर आठवण करून देतो, बावडा या जिल्ह्याबाहेर आहे असं कोणी म्हटलं नाही. पण चार महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या नेत्यांची भाषणं जर त्यांनी ऐकली तर लक्षात येईल की त्यांचे नेते बावड्याला स्वतःची जहागीर समजतात. आणि हे माहिती असूनही काल शौमिका महाडिक यांनी फक्त सभेच्या ठिकाणाबद्दल प्रश्न विचारले, बावड्यात सभा घेऊ नका अशी विनंती कुठेही केलेली नाही. कारण स्टेजवर उभे राहून ‘दांडकं घट्ट आहे’ म्हणणाऱ्या व्यक्तीची दंडुकशाही मोडण्याची धमक गोकुळच्या सभासदांमध्ये नक्कीच आहे.
कारखान्याचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध न करणारे कारखाने कोणाचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, “राहिला विषय राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा कधी कुठे झाली याचा तर श्रीमती रेडेकर यांना मी आठवण करून देतो, विनाकारण विषय भरकटू नये. ना तुम्ही राजारामच्या सभासद आहात ना मी. इथे विषय गोकुळच्या सभेचा आणि मागील वर्षभराच्या कारभाराचा सुरू आहे. अन्यथा जिल्ह्यात वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवालच प्रसिद्ध न करणारेही साखर कारखाने आहेत. आणि ते कोणाचे आहेत याची आठवण आम्हाला करून द्यावी लागेल. त्यांच्या पत्रकातील एकच गोष्ट पटण्यासारखी आहे ती म्हणजे गोकुळचे सभासद सुज्ञ आहेत. त्यामुळे सभासद त्यांचे प्रश्न सभेत विचारतीलच, यात काही दुमत नाही.”
1 thought on “सभेच्या दिवशी आमच्या फक्त चार प्रश्नांची उत्तरं द्या – रणजितसिंह पाटील मुरगूडकर”