कागल (प्रतिनिधी) : कागलच्या आठवडी बाजारात पुन्हा मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरवात केली असून ग्राहकांच्या खिश्यातील मोबाईल हातोहात लंपास केले जात आहेत. याविषयी तक्रार करण्यास कागल पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस फोन चोरी ऐवजी गहाळची नोंद करत आहेत. जेणेकरून मोबाईल आणि मोबाईल चोराच्या तपासाच्या कटकटी पासून वाचता येईल. तसेच पोलिसांच्या उद्धट बोलण्याने नागरिक तक्रार करण्यास धजत नाहीत.
पोलीस करत आहेत फोन चोरी ऐवजी गहाळची नोंद
कागलमध्ये सोमवार व गुरुवार या दिवशी दर आठवड्याला बाजारात भरतो. या बाजारात कागल तालुक्यातील व सीमाभागातील शेतकरी, भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक मोठ्या संख्येने येतात. या गर्दीचा फायदा घेत पाकीटमार आणि मोबाईल चोरटे घेत असतात. गेल्या काही वर्षापासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. याविषयी अनेकदा कागल पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पण याकडे मामुली प्रकरण समजून अजूनही पोलिस साफ दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे दिसून आले आहे. अनेक तक्रारदारांनी आपला मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार नोंदवली होती. पण पोलीस चोरी ऐवजी फोन गहाळची नोंद करत आहेत. जेणेकरून मोबाईल आणि मोबाईल चोराच्या तपासाच्या कटकटी पासून वाचता येईल.
उद्धट बोलणाने नागरिक तक्रार करण्यास धजत नाहीत
जर एखादा मोबाईल चोरीस गेला असता पोलिस सायबर सेल कडून लोकेशन ट्रॅकर द्वारे मोबाईल कुठे आहे हे नेमके ट्रॅक करता येते. आणि चोरट्यास पकडता येते. मोठ्या गुन्ह्यात उदारणार्थ खुना सारख्या प्रकरणात या पद्धतीचा अवलंब केला जातो. हे काम थोडे खर्चिक व वेळखाऊ आहे. त्यामुळे बऱ्याचदा अनेक पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी ऐवजी गहाळची नोंद केली जाते. पण ज्या व्यक्तीचा असा मोबाईल चोरीला जातो त्याचे मात्र खूप नुकसान होते. आजकाल स्मार्टफोन मध्ये व्यक्तीचा सर्व डेटा स्टोअर असतो. व्यक्तीचे महत्वाचे रेकार्ड, फोन नंबर, फोटो, महत्वाचे इमेल, व्हाटसअप, फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल पे, फोन पे आदी अकौंट, बँकेचे अकौंट नंबर हे स्टोअर असते. आणि जर मोबाईल चोरीस गेला तर त्याचा गैरवापर होऊन सदर व्यक्तीस आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे थोडे गांभीर्याने पाहावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.