आडी (प्रतिनिधी) : बेनाडी गावच्या पश्चिमेला, बेनाडी ते आडी मुख्य रस्त्यालगत मल्लिकार्जुन नगर परिसरात अंदाजे ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. होमगार्ड विनय बाबर यांनी या घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना दिली.
मृत व्यक्तीने अंगात लाल रंगाचा फुल शर्ट आणि तपकिरी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. सुरुवातीला हा मृतदेह रस्त्याच्या मध्यभागी पडलेला होता; मात्र काही नागरिकांनी तो बाजूला सरकवून ठेवला. मंगळवारी रात्री मद्याच्या नशेत रस्त्यावर कोसळल्यानंतर तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वेशभूषेवरून मयत व्यक्ती ऊसतोड कामगार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार रामगौंडा पाटील आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी निपाणी येथील गांधी रुग्णालयात आणि तेथून बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मयताची ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.