प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील श्री विठ्ठल मंदिरावरून सध्या स्थानिक राजकारण तापू लागले आहे. मंदिराच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सध्याच्या मंदिर व्यवस्थापनाकडून डावलले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
या संदर्भात नंदवाळ येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सुजित चव्हाण यांनी सांगितले की, मंदिराच्या अगदी सुरुवातीच्या उभारणीपासून ते आजवरच्या विकासापर्यंत स्वर्गीय रामभाऊ चव्हाण, स्वर्गीय सदाशिव पाटील आणि इतर अनेक ग्रामस्थांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्याच अखंड प्रयत्नांमुळे आणि त्यागामुळे या मंदिराला वारकरी संप्रदायात एक विशेष व मानाचे स्थान प्राप्त झाले आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.
व्यवस्थापनात राजकारण आणल्याचा आरोप
पत्रकार परिषदेत सुजित चव्हाण यांनी सध्याच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. “मंदिर ट्रस्टच्या दैनंदिन कामकाजात जाणीवपूर्वक राजकारण आणले जात असून, ज्यांनी मंदिरासाठी आयुष्य घालवले त्या जुन्या कार्यकर्त्यांनात बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. यासोबतच, मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये पूर्ण पारदर्शकता आणली जावी आणि सर्व जुन्या कार्यकर्त्यांसह वारकरी प्रतिनिधींना विश्वासात घेऊनच पुढील विकासकामे करण्यात यावीत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला ज्योतीराम पाटील, आनंदराव लाड, पांडुरंग केनवडे, भिकाजी पाटील, शंकर पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवस्थापनाच्या या भूमिकेमुळे आता आगामी काळात नंदवाळ विठ्ठल मंदिर ट्रस्टचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“मंदिर व्यवस्थापनात पारदर्शकता ठेवा आणि वारकऱ्यांना विश्वासात घ्या”; नंदवाळ येथे पत्रकार परिषदेत मागणी
Advertisements