मुरगूड (शशी दरेकर) : सहकारामध्ये नव्याने येऊ घातलेल्या अनेक नवनव्या गोष्टींची माहिती या सहकार प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी संस्थातील पदाधिकारी, संचालक व सेवक यांना प्राप्त होणार असून आधुनिक काळाकडे सहकारी संस्थांनी वाटचाल करणेसाठी ही प्रशिक्षणे महत्वाची आहेत . अशी प्रतिपादन डॉ. सुमित जांबोटकर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कागल यांनी केले ते मुरगूडच्या श्री. लक्ष्मी-नारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृह येथे कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डच्या वतीने सहकार मंत्रालय स्थापना दिन व सहकार सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.
प्रारंभी सरकार ध्वजाचे ध्वजारोहण मा. डॉ. सुमित जांबोटकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री पुंडलिक डाफळे होते. जिल्हा सहकार बोर्ड संचालक प्रविण सुर्यवंशी, दीपक माने, अनंत फर्नांडिस, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पुंडलिक डाफळे, सहकार बोर्ड संचालक प्रविण सुर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली.
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या सत्रामध्ये तात्यासो मोहिते प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य एस टी जाधव यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून उपस्थितांना मार्ग केले यामध्ये त्यांनी, सी.आर.आर, एस.एल.आर., व सी.आर.ए.आर. संकल्पना, माहिती व प्रॅक्टिकल तसेच चहापानानंतरच्या तिसऱ्या सत्रात सी.डी.रेशो, एन.पी.ए. आणि ए.बी.आर. व ए.एल.आर. संकल्पना व प्रेॅक्टिकल आदी विषयावर मार्गदर्शन केले. तर शेवटच्या सत्रामध्ये संगणक सॉफ्टवेअर तज्ञ मा. सुदाम पाटील यांनी सहकारी पतसंस्थेमध्ये संगणक वापर व सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हा सहकार बोर्डचे माजी विकास अधिकारी भरत साळोखे, लक्ष्मी-नारायण पतसंस्था संचालक विनय पोतदार, दादासो डवरी, श्रीकांत खोपडे, जिल्हा सहकार बोर्डचे एम बी कंगणे, मारूती सणगर आदींसह कागल तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी व सेवक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक एम बी कंगने यांनी, तर आभार विनय पोतदार यांनी मानले.