शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर द्या ; माजी खासदार संजय मंडलिक यांची राज्य केंद्र सरकारकडे मागणी

चुयेकरांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणास पाठिंबा

मुरगूड ( शशी दरेकर ) : “भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असूनही शेतीच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही.उत्पादन खर्चावर आधारित दर दिल्यास शेतीचे प्रश्न सुटू शकतात.” असे प्रतिपादन माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी केले.

Advertisements

ऊसाला ४५०० रुपये एफ. आर . पी. मिळावी,  साखरेचा दर ५१ रुपये करून निर्यात बंदी कायमची उठवावी तर इथेनॉल व सहवीज उत्पादनांत दरवाढ  व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते माणिकराव पाटील चुयेकर यांचे चुये गावात बेमुदत अन्नत्याग  उपोषण सुरू आहे.त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत  माजी खासदार प्रा. मंडलिक यांनी शेतीबाबत आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.यावेळी त्यांच्यासोबत गोकुळचे संचालक शशिकांत पाटील -चुयेकर उपस्थित होते.

Advertisements

माजी खासदार प्रा. मंडलिक म्हणाले,”वारसा हक्काने शेतजमिनी शेतकऱ्यांना मिळाल्या असल्या तरी त्यांच्या उत्पादित शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही.याबाबत सरकारचे धोरण बदलण्याची गरज आहे. उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मिटतील. या प्रश्नी साखर कारखानदारांनी सामुदायिक मेळावा घेऊन शासनाच्या पटलावर हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. “

माणिक पाटील -चुयेकर म्हणाले, ” उसासाठी सरकारने जाहीर केलेली ३६५० रुपयाची एफ. आर. पी. वाढीव शेतीतला वाढीव खर्च पाहता तोट्याची  आहे. ती  ४५०० रुपये करावी. आज साखर कारखानदारी अडचणीत असल्याने कारखान्यांना ती देणे शक्य नाही म्हणून  साखरेचा दर ५१ करावा, निर्यात बंदी उठवावी, इथेनॉलचा  दर वाढवून मिळावा आणि सहवीज  प्रकल्पातील विजेचा दर कमी करू नये. अशा उपाययोजना शासनाने कराव्यात ही आमची मागणी आहे.”


चौकट : १) प्रा.मंडलिक यांचा दूरध्वनी आणि आमदारांचा प्रतिसाद

चुयेकर यांच्या उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत माजी खासदार प्राध्यापक मंडलिक यांनी आमदार चंद्रदीप नरके व आमदार राजेंद्र यड्रावकर यांना हा प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी विनंती केली.त्यास दोन्ही आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


चौकट : दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांची उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा हीच मागणी होती. त्याचा विचार करून केंद्र व राज्य शासन, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी , कारखानदार ,शेतीतज्ञ आणि शेतकरी या सर्वांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर कायमचा तोडगा काढावा ,  अशी आग्रही मागणी माजी खासदार संजय  मंडलिक व  चुयेकर यांनी केली.

यावेळी उपोषण स्थळी शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!