पेठवडगाव : वडगाव नगरपरिषद वडगाव यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला एकल महिला सक्षमीकरण कार्यक्रम श्री मराठा समाज हॉल, पेठवडगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सुमारे ४०० हून अधिक एकल व विधवा महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
वडगाव नगरीच्या प्रथम नागरिक तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. विद्याताई पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी एकल महिलांनी स्वतःला कधीही एकटे समजू नये, वडगाव नगरपरिषद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जातील, असे सांगितले. तसेच महिलांनी समाजातील सक्षम, कर्तृत्ववान आणि आत्मविश्वासाने जगणाऱ्या व्यक्ती म्हणून पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास नगरसेविका सौ. सुरेखा अनुसे, सौ. वर्षा पवार, सौ. रूपाली माने, सौ. कल्पना भोसले व सौ. धनश्री पोळ नगरसेवक शिवाजीराव आवळे ( आण्णा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सौ. कौशल्य पवार यांनी कौशल्य विकास व रोजगाराभिमुख योजनांची माहिती दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या हातकणंगले तालुका प्रतिनिधी सौ. सविता पोळ यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन केले.

दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्था, नाशिकचे जनसंपर्क अधिकारी श्री. अभिजित जाधव यांनी स्वयंरोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सौ. सविता ठोंबरे यांनी महिला बचत गटांमार्फत उपलब्ध होणाऱ्या कर्ज योजना, रोजगार निर्मिती व व्यवसाय कर्जाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
महिला व बालकल्याण अधिकारी सौ. श्रद्धा माने यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ श्री. शिवराज जाधव यांनी केले. एकल व विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा मार्गदर्शक मेळावा यशस्वी ठरला.