१५ जूनअखेर काम पूर्ण करण्याचे आश्वासन
मुरगूड ( शशी दरेकर ) : गडहिंग्लज – कागल रस्त्यापैकी मुरगूड शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत दिरंगाई होत असल्याने येथील नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रस्ता प्रकल्प अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी नगरपालिकेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून येत्या १५ जून अखेरपर्यंत मुरगूडातील रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
कागल गडहिंग्लज रस्त्यांपैकी मुरगुडमध्ये कापशी रोड – हुतात्मा तुकाराम चौक ते बीएसएनएल ऑफिस हा मार्ग मुरगूड शहरांतर्गत येतो. या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालले असल्याचा आरोप करत मुरगुडच्या सत्ताधारी नगरसेवकांनी आंदोलन केले होते. दोन दिवसात कामाबाबत प्रगती न दिसल्यास रस्त्याचे काम रोखण्याचा इशारा दिला होता. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास नागरिकांना व नगरपालिकेला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागण्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली होती.

आंदोलन स्थळी न आलेल्या अथॉरिटी इंजिनियर तिवारी यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्यामुळे अधिकाऱ्यांनी धावत पळत येऊन आज नगरसेवकांशी चर्चा केली. या पार्श्वभूमीवर आज प्रकल्प अधिकाऱ्यांनी नगरपालिकेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

चर्चेअंती लेखी आश्वासन पुढील प्रमाणे देण्यात आले. सात मीटर रुंदीने आवश्यक त्या ठिकाणी गटर्ससह काम पूर्ण करणे. बसस्थानक ते तुकाराम चौक या मार्गावरील इलेक्ट्रिक पोल २२ मे पर्यंत हटवणे व तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करणे. नाका नं. १ ते बसस्थानक टॉप लेअरचे काम दोन दिवसात सुरू करणे. मुरगूड शहरातील रस्त्यांचे ३० मे पर्यंत काँक्रिटीकरण संपवणे आणि १५ जून अखेर गटर्स व फुटपाथसह काम संपवणे.
यावेळी रस्ता प्रकल्प विभागाकडून अथॉरिटी इंजिनियर प्रदीप तिवारी, प्रकल्प अधिकारी सतीश चौगले, लायझनिंग ऑफिसर विजय चौगले, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर शरीफ महम्मद, पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अतिश वाळुंज, पाणीपुरवठा अभियंता रोहित आतवाडकर, अमित मोरस्कर, रवी माडेकर, तुषार कांबळे, तर आंदोलन कर्त्यांच्या वतीने नगरसेवक शिवाजी चौगले, दत्तात्रय मंडलिक, राजू आमते, दीपक शिंदे, सुनिल मंडलिक, सुनील रणवरे, पुंडलिक लोकरे आणि पत्रकार यांनी चर्चेत भाग घेतला.