कागल (विक्रांत कोरे) : घरचं आठरा विश्व दारिद्र्य दोन वेळा च्या पोटाची वाणवा पोटाला चिमटा देऊन उपाशी राहायचं. पती-पत्नी दोघेही अडाणी पण मुलींना शिकवुन मोठं करायचं ही खुणगाठ उराशी बाळगली.
उसाचं कांड तोडून -तोडून हाताला जसं फोड उठलं, तसं पोरींना तळहाताच्प्रया फोडाप्ररमाणे जपलं शिक्षण दिलं. मोठं केलं. आज पोरी मोठी झाल्या. पोरीना शिकवलं अन् चांगल्या ठिकाणी नोकरीसही त्या लागल्या. आई-वडील अभिमानाने आज सांगत आहेत *माझ्या पोरी सायबीनी झाल्या हो*डोळ्यातले आनंदाचे अश्रू सांगतात हीच जीवनगाथा ही यशोगाथा आहे. द-याचे वडगाव येथील बेनके कुटुंबीयांची श्रीकांत बेनके व वैशाली बेनके हे भाग्यवान मातापित्याचे नाव आहे.
द. वडगाव (ता. करवीर) येथील श्रीकांत बेनके गेले सत्तावीस वर्षे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करीत आहेत.परिस्थितीमुळे स्वतः शिकू न शकल्याने ऊस तोडणीच्या उचलीवर दोन मुलींना प्रसंगी पोटाला चिमटा देऊन उच्चशिक्षित केले. यापैकी मोठी मुलगी मयुरीची नुकतीच सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कृषी अधिकारीपदी निवड झाली.तर लहान मुलगी प्रियांका सहा महिन्यापूर्वी मुंबई पोलीस दलात भरती झाली आहे. या दोघींच्या यशाने ऊस तोडणी मजूर असलेल्या श्रीकांत यांच्या कष्टाचे चीज झाले आहे. त्यामुळे श्रीकांत यांच्या घरी अभिनंदनसाठी रिघ लागली असून ते सर्वांना ‘माझ्या पोरी सायबीनी झाल्या’ असं छातीवर हात ठेवून अभिमानाने सांगत आहेत.
एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे श्रीकांत व त्यांच्या मुलींची यशोगाथा परिस्थितीचा बाऊ करून शिक्षणाला रामराम ठोकणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
द.वडगाव या पांढऱ्या पट्ट्यातील कोरडवाहू गावात परिस्थितीमुळे त्यांना पाचवीतच शिक्षण सोडावे लागले. घरची केवळ अर्धा एकर शेती, ती ही कोरडवाहू.पाण्याअभावी त्यामध्ये खरीप हंगामीच पिके घ्यावी लागतात. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्यामुळे त्यांनी अठ्ठावीस वर्षांपूर्वी ऊस तोडणीचे खुरपे हातात घेतले.या उचलीवरच त्यांनी संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली.
एकीकडे मुलगाच पाहिजे असा अट्टाहास धरला जात असताना त्यांनी दोन मुलींवरच थांबण्याचा निर्णय घेतला आणि या मुलींनाच शिकवण मोठे करण्याचा निर्धार केला. प्रियांका बारावी पर्यंतच्या शिक्षणानंतर एका खाजगी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन मुंबई पोलीस दलात भरती झाली. तर मयुरीने बारावी सायन्सनंतर तळसंदे येथे बीएस्सी (कृषी) पर्यंत शिक्षण घेतले.त्यानंतर तिचा विवाह झाला.विवाहानंतर तिने घरीच अभ्यास करून कृषी अधिकारी पदी गवसणी घातली आहे.
मुलांप्रमाणेच मुलींना शिकवण्याचे ठरविले.हौस-मौज यांना मुरड घातली, प्रसंगी उपाशी राहिलो.मात्र मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही कमतरता भासू दिली नाही. त्यांनीही आमच्या कष्टाची जाणीव ठेवत यश मिळवले. दोन्ही मुलींचा अभिमान वाटतो.आम्ही घेतलेल्या कष्टाचे मुलींनी चीज केले-श्रीकांत बेनके
ऊसाचा पाला,खुरपं, हार-बुके आणि पेढे…!
मुलींच्या शिक्षणासाठी सलग अठ्ठावीस वर्षे हातात खुरपं धरलेले श्रीकांत चार महिने रात्रंदिवस ऊसाच्या पाल्यातच असायचे.त्यांना घरी गोडधोड करण्याचे फार कमी प्रसंग मिळायचे.मात्र मुलींच्या यशानंतर त्यांच्या घरी अभिनंदनसाठी येत असलेले नातलग,मित्र- मंडळी हार-बुके देऊन कौतुक करताना पेढा भरवून तोंड गोड करीत आहेत. त्यामुळे बेनके कुटुंबीय कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघाले आहे.