मुरगूड ( शशी दरेकर ) – सध्या देशाची वाटचाल विनाशाच्या दिशेने होत आहे.आरोग्य,शिक्षण,उद्योग-व्यवसाय,शेती व पर्यावरण हा देशातील मुलभुत गरजा प्राधान्यक्रम असायला पाहिजेत पण मुलभुत गरजांना दुर्लक्षित करून धर्मव्यवस्थेचे समर्थन मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रत्येक धर्मांधतेचा अंतिम मुक्काम तालिबान असतो.आपल्या देशाची वाटचाल सुद्धा तालिबानी प्रवृत्तीच्या दिशेने चालली आहे अशा ह्या सामाजिक आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे वर्तमानकाळ गुदमरतो आहे असं प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार यांनी केले.ते नवनिर्माण सामाजिक चळवळ आयोजित कार्यकर्ता प्रबोधन मेळाव्यात बोलत होते.
सुरूपली ता.कागल येथे नवनिर्माण सामाजिक चळवळ सुरुपली यांच्या वतीने दलितमित्र एस.आर.बाईत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कार्यकर्ता प्रबोधन मेळावा’ आयोजित केला होता.यावेळी प्रा.डाॅ अर्जुन कुंभार यांनी ‘आम्ही चालतोय विनाशाची वाट’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत एम.ए.नाईक होते.कार्यक्रमाचे स्वागत भिमराव कांबळे यांनी केले.तर प्रास्ताविक दलितमित्र एस.आर.बाईत यांनी केले.
डॉ.कुंभार पुढे म्हणाले,देशात वाढत चाललेला सामाजिक व सांस्कृतिक दहशतवाद संपवायला हवा यासाठी ‘भारतीय’ हित जात व ‘मानवता’ हाच धर्म मानुन लोकशाहीप्रधान मुल्यांचा स्वीकार करायला पाहिजे.अतिरेकी अस्मिता टाळून उभंटु संस्कृती (हातात हात घालून पुढे जाणे) अंमलात आणली पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात एम. ए.नाईक म्हणाले देशामध्ये प्रबोधनाची व परिवर्तनाची चळवळ क्षीण होत आहे हि बाब गंभीरच आहे पण सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते हिच चळवळ जिवंत असण्याची लक्षणे आहेत.जातीव्यवस्थेमध्ये व धर्मव्यवस्थेवर आधारलेला भारत देश अंद्धश्रध्दाळु बनत चालला आहे.अशावेळी नितीमान समाज व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आहे.
यावेळी सचिव बाळासाहेब ढवण, एम.टी.सामंत, पापा जमादार, भिमराव कांबळे, सचिन सुतार, विकास सावंत, दिलीप निकम, संजय जिरगे, गणेश कांबळे, विक्रम पाटील, समाधान सोनाळकर, दत्तात्रय कांबळे व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.आभार विकास सावंत यांनी मानले.