२७५१ कोटीची वार्षिक उलढाल ; उच्चांकी लाभांश देणार -चेअरमन अविनाश चौगले यांची घोषणा
मुरगूड (शशी दरेकर) : जिल्ह्यातील सुमारे दहा हजार माध्यमिक शिक्षण सभासदांची अर्थवाहिणी असलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण (को.जि.मा.शि.) पतसंस्थेला सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षात ५ कोटी ३० लाख इतका नफा झाल्याची माहिती चेअरमन अविनाश चौगले व व्हा.चेअरमन ऋतुजा पाटील यांनी दिली. संस्थेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन चौगले बोलत होते.
चेअरमन चौगले म्हणाले, ” शिक्षकनेते दादासाहेब लाड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीचा कारभार परंपरा कायम ठेवली आहे. कर्जाची वसुली चिकाटीने करून नेट एन. पी. ए. 0 % आणण्यात संस्था यशस्वी ठरली आहे. सहकारातील आणि शासन यातील बदलत्या धोरणानुसार संस्थेचे कामकाज सुरू असून एक हजार कोटींच्या ठेवीचा टप्पा संस्था लवकरच पूर्ण करेल.”

यावेळी बोलताना दादासाहेब लाड म्हणाले, ” दरवर्षी प्रमाणे या वर्षीही संस्थेस विक्रमी नफा झाला आहे. यातून सभासदांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा आमचा मानस आहे. जानेवारी पासून सुकन्या ठेव योजना व कन्यादान साडी योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या भेट रक्कमेत वाढ करून यापुढे रु ४००० प्रमाणे लाभ दिला जाईल.संस्थेकडे ६६५ कोटीच्या ठेवी असून गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने ५४२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेने २६९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच संस्थेकडे रु ८२२ कोटीचे खेळते भांडवल असून २७५१ कोटीची वार्षिक उलढाल केली आहे. संस्थेस ५ कोटी ३० लाख इतका नफा झाला आहे. संस्थेने नेहमीच २० ते २५ % इतका विक्रमी लाभांश दिला आहे.कोजिमाशि अँपच्या माध्यमातून सर्व व्यवहार सभासदांपर्यंत थेट पोहचण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.