करंजीवणे: करंजीवणे ग्रामपंचायतीचा कारभार सध्या मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) मागितलेली विकासकामांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने प्रशासनाने आता गंभीर दखल घेतली आहे. माहिती अधिकाराची पायमल्ली केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी (BDO) बोंगे साहेब यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष ‘चौकशी समिती’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
बाळासो कांबळे यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी माहिती अधिकारांतर्गत ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची माहिती मागितली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही त्यांना कोणतीही समाधानकारक माहिती देण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांनाही ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवल्याने अखेर पंचायत समितीने कठोर पाऊल उचलले आहे.

ग्रामसेवकावर गंभीर आरोप
माहिती न देण्यासोबतच, ग्रामसेवक संग्राम संकपाळ यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप होत आहेत. माहिती अधिकाराची मागणी करणाऱ्या चे फोन संभाषण रेकॉर्ड करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही समोर आला आहे. ग्रामसेवकाच्या या कृतीमुळे गावात संतापाचे वातावरण असून, ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भ्रष्टाचाराचा संशय; आंदोलनाचा इशारा
माहिती लपवून ठेवल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. चौकशी समितीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर या चौकशीत माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही आणि भ्रष्टाचाराचे वास्तव समोर आले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आता या चौकशी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, करंजीवणे ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचा पर्दाफाश होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.