बामणी येथील खुनातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
कागल (विक्रांत कोरे) : खून करून मृतदेह कागल तालुक्यातील बामणी येथे टाकलेल्या खुनाचे रहस्य पोलिसांनी केवळ २४ तासात उलगडले. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सदरचा खून मयत अमरसिंह थोरात चे वडील व भाऊ या दोघांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा खुन केवळ चैनीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून धमकवल्यामूळे वडील व मुलगा यांच्यात झालेल्या जोरदार भांडणातून झाला आहे.
वडील दत्ताजीराव थोरात वय वर्ष 57 व भाऊ अभिजीत थोरात वय वर्ष 26 राहणार दोघेही गोटखिंडे तालुका वाळवा, जिल्हा सांगली या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मयत अमरसिंह थोरात वय वर्ष 30 यास दारूचे व्यसन होते. तो एम पी एस सी परीक्षेचा अभ्यास 2009 ते 2019 पर्यंत पुणे येथे करीत होता. त्यानंतर तो आपल्या घरी अभ्यास करायचा. स्पर्धा परीक्षेत यश न मिळाल्याने तो नाराज होता. गतवर्षीपासून तो कोल्हापुरात राहून कायद्याच्या पदवीचा अभ्यास करीत होता. दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने नेहमी घरातून लागेल तेवढे पैसे मागायचा, चैनीसाठी व खर्चासाठी वडिलांकडे अवाढव्य पैशाची मागणी करीत असे यातून वडिलांच्यात व त्याच्यात सातत्याने भांडणे व्हायची.
दिनांक 30 मे 2023 रोजी सायंकाळी अमरसिंह मूळ गावी म्हणजे घोटखिंडे तालुका वाळवा येथे गेला. त्यांनी वडिलांकडे मोबाईल घेण्यासाठी व खर्चासाठी रुपये दीड लाखाची मागणी केली. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. पैसे न दिल्यास घरच्यांना ठार मारू अशी धमकी दिल्याने वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. वडिलांना राग अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात लोखंडी पाईप घेऊन अमरसिंहच्या डोक्यात जोराने मारले. तो जमिनीवर कोसळला.
त्याला उपचारासाठी न नेता घरातच रात्रभर ठेवले. डोक्यातील झालेल्या प्रहाराने रक्तस्त्राव झाला व त्याची प्राणज्योत मावळली. दुसऱ्या दिवशीही मृतदेह घरातच ठेवला 31 मे 2023 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अमरसिंह चा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या होंडा कंपनीच्या अमेझ गाडीच्या डिकीत ठेवला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सदरचा मृतदेह कागल तालुक्यातील बामणी येथे तारीख १ जून च्या पहाटे दरम्यान रस्त्याकडेला झुडपात आणून टाकला. संशयीत आरोपी वडील दत्ताजीराव थोरात, भाऊ अभिजीत थोरात, जणू काही आपल्याला यातील माहीतच नाही असा त्यानी आव आणला. पोस्टमार्टम नंतर त्यांनी मृतदेह आपल्या गावी नेऊन अंत्यविधी केला. पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करीत पोलीसी खाक्या दाखवताच खुनाची कबुली त्या दोघांनी दिली.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे, सुनील कवळेकर, सुरेश पाटील, विलास किरोडकर, संजय पडवळ, आयुब गडकरी, राजेंद्र वरंडेकर, रफिक आवळकर, नामदेव यादव, यांनी तपास कामी सहकार्य केले. कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रविकांत गच्चे हे पुढील तपास करीत आहेत.
कागलच का? गुलदस्त्यात….?
कागल तालुका आणखी वाळवा तालुका यातील अंतर बरेचसे आहे असे असताना वाळवा तालुक्यात खून करून हा कागल तालुक्यातील बामणी गावात रस्त्याकडेला आणून टाकण्या पाठीमागचे कारण नेमके काय असावे ? आरोपीने कागल तालुकाच का निवडला ? पुरावे नष्ट करण्या पाठीमागचे षडयंत्र काय ? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या सखोल तपासानंतरच मिळतील.