बातमी

मुरगूडमध्ये शुक्रवार ६ जानेवारी ते रविवार दिनांक ८जानेवारी अखेर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे (सिटू) १६ वे राज्य अधिवेशन होणार

मुरगूड ( शशी दरेकर ) : सिटू या राष्ट्रीय कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात मुरगूड या ऐतिहासिक शहरांमध्ये होत आहे.

या अधिवेशनाची पूर्वतयारी, नेटके नियोजन करण्यात येत आहे. उपस्थित राहणाऱ्या कामगार प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था तसेच अधिवेशनाच्या ठिकाणी सभा परिसंवाद चर्चा यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. कोल्हापूर शहर ते मुरगुड तसेच कागल ते मुरगुड या महत्त्वाच्या रस्त्यांवर संघटनेचे ध्वज, बॅनर, पताका, डिजिटल फलक लावण्याचे काम सुरू आहे. मुरगुड शहरांमध्ये पाचशेहून अधिक ध्वज आणि पताका लावण्यात येणार आहेत. शहरातील तरुण मंडळे, सामाजिक सेवाभावी संस्था यांनी या अधिवेशनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व राजर्षी शाहू महाराज जन्म शताब्दी वर्ष या दोन ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर मुरगुड या शहरात हे अधिवेशन संपन्न होत आहे.स्वातंत्र्य चळवळीतील मुरगूड शहराचे योगदान आणि राजर्षी शाहू महाराज  यांची जन्मभूमी कागल तालुक्यातील  ऐतिहासिक ठिकाण असणाऱ्या मुरगूड मध्ये हे अधिवेशन होत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र राज्यातील कामगार चळवळीत काम करणारे साडेचारशे कामगार प्रतिनिधी या अधिवेशनासाठी मुरगुड मध्ये दाखल होणार आहेत. या अधिवेशनात महत्त्वाचे ठराव करण्यात येणार आहेत. कामगार विरोधी श्रम संहिता मागे घ्या, बेरोजगारी कमी करा,जाती-धर्माच्या आधारावरील राजकारण बंद करा, खाजगीकरण,उदारीकरण,निर्गुंतवणूक धोरण मागे घ्या. कंत्राटी व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा यासह सरकारने घेतलेल्या कामगार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधातील शासकीय निर्णयाच्या विरोधात ठराव करण्यात येणार आहेत.

सिटूच्या ऑल इंडिया अध्यक्ष कॉम्रेड हेमलता,ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी तपन सेन, कामगार नेते माजी आमदार  नरसय्या आडम, सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जनरल सेक्रेटरी एम. एच. शेख, राज्य कोषाध्यक्ष के. आर. रघु, लाल बावट्याचे तरुण व लढाऊ आमदार  विनोद निकोले यांच्यासह सिटूचे राज्य पदाधिकारी या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक सहा सात आणि आठ जानेवारी सलग तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची सुरुवात मुरगूड येथील ऐतिहासिक हु.तुकाराम भारमल चौक ते मुरगुड बीएसएनएल कार्यालय अशी रॅली काढण्यात येणार असून मुरगुड येथील बाजारपेठेत या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत होणार आहे. प्रथम दिवशी जाहीर सभा झेंडावंदन स्मृतिस्तंभास अभिवादन त्यानंतर सिटीच्या अहवालाचे वाचन असा नियोजित कार्यक्रम आहे सात जानेवारी रोजी प्रतिनिधी सत्र व मान्यवरांचे मार्गदर्शन तर आठ जानेवारी रोजी पुढील तीन वर्षांसाठी नूतन पदाधिकारी व जनरल कौन्सिल मेंबर यांची निवड होणार आहे. कर्नाटक राज्यातील बंगळुरू या ठिकाणी २८ ते २३ जानेवारी अखेर होणाऱ्या सिटीच्या राष्ट्रीय अधिवेशनास पाठवण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे. या अधिवेशनास जिल्ह्यातील कामगार कष्टकरी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आले.

या निर्धार बैठकीसाठी कॉम्रेड भरमा कांबळे, काॅ.सुभाष जाधव,काॅ.चंद्रकांत यादव, काॅ.शिवाजीराव मगदूम, काॅ विक्रम खतकर, काॅ.उज्वला पाटील, काॅ.मोहन गिरी, काॅ. प्रकाश कुंभार, काॅ.आनंदा कराडे, काॅ.राजाराम आरडे, काॅ.अंबादास कुणगिरी, काॅ.जयवंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *