४४ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
कागल(विक्रांत कोरे): शाहू साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने सध्या होत असलेल्या इथेनॉल निर्मितीमध्ये आणखी वाढ करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी दैनंदिन १०० किलो लिटर (के एल पी डी )क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.अशी घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या 44 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. covid-19 परिस्थितीमध्ये शासकीय निर्देशांचे पालन करत ही सभा ऑनलाइन झाली. या सभेत सभासदांनीही ऑनलाइन पद्धतीने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. श्री घाटगे पुढे म्हणाले, शाहूने मागील गळीत हंगामात उसाच्या थेट रसापासून इथेनॉल निर्मितीचा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. सध्या इथेनॉलला मागणी चांगली आहे व भविष्यातही ती राहणार आहे. उसापासून साखर तयार करून त्याची विक्री करून पैसे मिळण्याच्या तुलनेत उसाचे थेट रसापासून इथेनॉल निर्मिती करून लवकर पैसे मिळतात त्यामुळे कारखान्यावर व पर्यायाने शासनावर अतिरिक्त साखर साठ्याचा भार कमी होण्यास हातभार लागतो व कारखान्याच्या अर्थव्यवस्था पण मजबूत होण्यास सुद्धा फायदा होतो. असेही त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्यास सन २०१९-२० करीता बेस्ट केन डेव्हलपमेंट वर्क अॅवॉर्ड मिळालेबद्दल,उच्चांकी ऊस गाळप व उच्चांकी साखर निर्मिती केलेबद्दल,सभासदांना मोफत सॅनिटायझर पुरवठा केलेबद्दल, पुरबाधीत ऊसास अग्रक्रमाने तोड देणेचा निर्णय घेतलेबद्दल, कारखान्यास जर्मनीच्या कंपनीकडून ISO आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळालेबद्दल व “बेस्ट इन क्लास मॅन्युफॅक्चरींग लिडरशीप अॅवॉर्ड’ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळालेबद्दल चेअरमन समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांचे वतीने केला. सभेच्या सुरूवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांचे प्रतिमेचे पुजन श्री.घाटगे यांनी केले. स्वागत व श्रध्दांजली वाचन व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले.सभासदांकडून आलेले अभिनंदन ठराव व सूचना वजा प्रश्नांचे वाचन सेक्रेटरी एस ए कांबळे यांनी केले.त्यास चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी खुलासेवार उत्तरे दिली.चांगल्या सूचनांचा स्वीकारही केला. आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले. वंदे मातरम् होऊन सभेच्या कामकाजाची सांगता झाली.
छायाचित्र- कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या 44 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे व्यासपीठावर व्हा चेअरमन अमरसिंह घोरपडे, कारखान्याच्या संचालिका व शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे,ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी उर्जामंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण .