आदमापूरच्या बाळूमामा देवस्थानात भंडारा अन् बकऱ्यांच्या विक्रीत कोट्यवधींचा घोटाळा

धीरज सावर्डेकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

मुरगूड (शशी दरेकर): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थानातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी सध्या चौकशी सुरू असतानाच, आता जून महिन्यात खरेदी केलेला भंडारा आणि बकऱ्यांच्या विक्रीत कोट्यवधींचा नवीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Advertisements

या संपूर्ण प्रकरणाची तुकाराम मुंढेंसारख्या धडाकेबाज अधिकाऱ्याकडून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा भाविकांना सोबत घेऊन आमरण उपोषण करू, असा इशारा बाळूमामा भक्त धीरज दिलीप सावर्डेकर (रा. मुरगूड) यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी धर्मादाय आयुक्त, मुरगूड व भुदरगड पोलीस ठाण्याला निवेदन दिले.

Advertisements

धीरज सावर्डेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, देवस्थानाने २ जून २०२६ रोजी २ टन भंडारा २ लाख ४० हजार रुपयांना खरेदी केला, तर अवघ्या काही दिवसांत म्हणजेच २९ जून रोजी पुन्हा २ टन भंडाऱ्यासाठी ३ लाख ७५ हजार रुपये मोजले. एकाच महिन्यात दरामध्ये ही तफावत कशी? विशेष म्हणजे हा भंडारा प्रत्यक्षात देवस्थानात पोहोच झालेलाच नसून त्याची कोणतीही नोंद पुस्तकात नाही.

याशिवाय, सर्वात मोठा गैरव्यवहार बकऱ्यांच्या विक्रीत झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटवरून ही विक्री होणे अपेक्षित असताना केवळ साध्या पावत्यांद्वारे व्यवहार करण्यात आले.

Advertisements

३१ मे ते १ जुलै २०२६ या काळात तब्बल ५,७७६ बकऱ्यांची विक्री झाली. पावत्यांवर बकऱ्यांची संख्या असली तरी मिळालेल्या रकमेची कोणतीही नोंद नाही. प्रति बकरी सरासरी १० हजार रुपये दर धरल्यास हा घोटाळा ६ कोटी रुपयांहून अधिक असल्याचा दावा सावर्डेकर यांनी केला आहे.

देवस्थानचे सर्व व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेतून होणे बंधनकारक असताना, ते स्थानिक बँका आणि पतसंस्थांमधून केले जात असल्यामुळे या संशयाला पुष्टी मिळत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!