मुरगूड ( शशी दरेकर ): चालू गळीत हंगाम २०२६-२७ मधील उसाला योग्य व उच्चांकी दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मुरगूड ते कागल आत्मक्लेश लाँग मार्चला शनिवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला.
शिवतीर्थ, मुरगूड येथून सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेत हजारो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते .
शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध घोषणा देत पदयात्रेला सुरुवात झाली. ऊस दराबाबत कोल्हापूर येथे झालेल्या शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांच्या बैठकीत अंतिम तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

मुरगूड-भडगाव-केनवडे फाटा मार्गे ही पदयात्रा कागल येथे पोहोचणार आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.दरम्यान कागल ते मुरगूड दरम्यानच्या विविध गावांमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जागोजागी न्याहारी आणि जेवणाची नियोजन देखील करण्यात आले होते ‘एकजूट दाखवूया, हक्काचा दर घेऊया’, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पदयात्रा शांततामय व लोकशाही मार्गाने काढण्यात आली असून, पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.