मंडलिक, महाडिक की समरजितराजे गटाकडुन ?
मुरगूड(प्रतिनिधी) : राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेची नविन पदाधिकारी निवड होणार आहे. अध्यक्ष किंवा इतर सदस्य पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी अनेकांचे शर्थीचे प्रयत्न चालु आहेत.
तालुक्यातील गटातटाच्या राजकारणामुळे संजय गांधी निराधार योजनेची मुळ संकल्पना माहीत नसलेले कार्येकर्ते सुद्धा हे पद आपल्या पदरात पडावे यासाठी अडुन बसलेले पहायला मिळत आहे.या योजनेच्या सदस्य पदासाठी आणखी एका नावाची जोरदार चर्चा चालु आहे ती स्वराज्य निर्माण संस्थेचे संस्थापक संदिप बोटे यांच्या नावाची. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाज हितासाठी झटणाऱ्या व समाजमनाच्या व्यथांची जाण असणाऱ्या संदिप बोटेंचा या नावासाठी विचार होवु शकतो असा सूर अनेकांमधून उमटताना दिसत आहे.
अवचितवाडी ता.कागल येथे जन्म झालेलं संदिप शिवाजी बोटे हे 2017 पासुन स्वराज निर्माण या संस्थेच्या नावाखाली अनेक सामाजिक उपक्रमांमधुन सामाजिक बांधिलकी जपत आहेत. आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे ‘आपला गाव आपला विकास’ यावर मार्गदर्शन, महिलांसाठी होम मिनिस्टर तसेच विविध स्पर्धा,विधवांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप, गृहपयोगी प्रशिक्षण शिबिरे, उल्लेखनिय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप,वह्या वाटप,विद्यार्थ्यांसाठी मोफत ओळखपत्र वितरण केले आहे. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त विविध योजना, व्याख्याने, प्रबोधनात्मक शिबिरे, प्रशिक्षण शिबिरे, आरोग्य शिबिरे,क्रिडा स्पर्धा,विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धा असे प्रयोग संदिप बोटेंनी यशस्वी केले आहेत.
स्वराज्य निर्माणच्या माध्यमातुन शेतकर्यांसाठी अनुदानित कडबा यंत्र वाटप, अनुदानित औषध फवारणी पंप वाटप,राष्ट्रीय सणाला मजुरांना जिलेबी वाटप, असे उपक्रम राबविले आहेत.त्याचबरोबर कोरोना काळातही या संस्थेने आपल्या कामांमधून समाजासाठी मदतीचा हात दिला आहे.कोरोना काळात इम्युनिटी बुस्टर डोसचे वाटप, सॅनिटाईजर वाटप, उपेक्षितांसाठी धान्य वाटप, कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या कोरोना योध्यांना जेवनाची व्यवस्था,मास्क वाटप, कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी पुढाकार,कोरोना योध्यांचा सत्कार असे अनेक उपक्रम संदिप बोटेंनी राबविले आहेत.त्याची पोहच पावती म्हणुन अनेक सामाजिक संघटनांनी विविध पुरस्कारानी त्यांना सन्मानित केले आहे.
या सर्व उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन,उपेक्षित, निराधार लोकांच्या समस्यांची जाण असणारा तळमळीचा कार्यकर्ता म्हणून संदिप बोटेंना निराधार योजनेच्या सदस्य पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. संदिप बोटे हे मुळचे मंडलिक गटाचे पण 2017 च्या ग्रामपंचायत निवडणुकी वेळी सरपंच पदाला डावलल्यानंतर बोटेंनी एकला चलो रे चा नारा देत राजकारणापासून अलिप्तता स्वीकारली व तिथूनच त्यांच्या सामाजिक कामाला गती मिळाली.
कदाचित हे पद त्यांना मंडलिकांच्या कोट्यातून मिळाले तर त्यांची परत घरवापशी होवू शकते.विरेंद्र मंडलिकांशी बोटेंचे असणारे मैत्रीचे संबध यामुळे हे पद बोटेंना मिळु शकेल अशा चर्चांना फारच ऊत येत आहे.तर संदिप बोटेंचा खासदार धनंजय महाडिक यांच्याशी वाढता सलोखा व बोटेंच्या कार्यक्रमांना अनेकवेळा पृथ्वीराज महाडीकांनी लावलेली हजेरी यामुळे महाडिक गटाचा प्रतिनिधी म्हणून या समितीवर बोटेंना संधी मिळू शकते.याचा तालुक्यातील महाडिक गट बळकट करण्यासाठी नक्कीच फायदा होवू शकतो शिवाय कागल तालुक्यात या गटाला हक्काचा प्रभावी चेहरा मिळू शकतो.
समरजितराजे घाटगे हे 2024 चे विधानसभा मैदान मारण्यासाठी पायाला भिंगरी बांधुन संपुर्ण मतदारसंघात गट वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.समोर तगडं आव्हान असल्यामुळे गटातील दोन व तीन नंबरची फळी मजबूत असण्याची गरज आहे.अशा परिस्थितीमध्ये संदिप बोटे या युवा कार्यकर्त्याला या निराधार समितीवर काम करण्याची संधी मिळाल्यास याचा फायदा विविध अंगाने राजे गटाला होवू शकतो.बोटेंचा दांडगा लोकसंपर्क,भाषण कौशल्ये, सामाजिक काम करण्याची आवड,विवेकी राजकीय समज या सगळ्याचा फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत होवू शकतो.त्याचबरोबर चिखली जिल्हा परिषदेत मतदार संघात राजे गटाची धुरा समर्थपणे सांभाळाणारा एक सक्षम कार्यकर्ता राजे गटाला मिळणार आहे.
संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या संजय गांधी निराधार समितीवर,निराधारांसाठी साठी काम करणाऱ्या, राजकीय निराधार असणार्या संदिप बोटेंना काम करण्याची संधी मिळाल्यास नक्कीच या संधीच सोनं केल्याशिवाय ते राहणार नाहीत असा विश्वास सामान्य नागरीकांतुन सुद्धा व्यक्त होत आहे.नजिकच्या काळात बोटेंना या पदावर काम करण्याची संधी मिळेल अशी स्थानिक राजकिय अभ्यासकांची पण मते आहेत पण त्यांना कोणत्या गटातून संधी मिळणार? मंडलिक,महाडिक की राजे समरजित घाटगे ? हे पाहणं औस्त्युक्याचे राहणार आहे.