मुरगूड ( शशी दरेकर ) : निपाणी मुदाळ तिट्टा मार्गावरील निढोरीजवळ असलेल्या म्हारकी नावाच्या म्होरी पुलामूळे पाण्याला तुंब येवून शेती पीकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामूळे पूलाच्या रुंदीकरणासाठी सोमवार दि २२ मे२०२३पासून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निपाणी -मुदाळ तिट्टा या राज्य मार्गावर मुरगूड – निढोरी दरम्यान म्हारकीचा छोटा पूल आहे. या राज्य मार्गाचे सध्या रुंदीकरणासह काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. या कामाबरोबरच म्हारकीचा छोटा म्होरीवजा पूल बांधण्यात आला आहे . पण तो एकदम अरुंद बांधला आहे.
तसेच या पुलाच्या उत्तर बाजूस भराव टाकण्यात आला आहे त्यामूळे पाण्याचा विसर्ग होत नाही . पावसाच्या पाण्याला तुंब येतो व परिसरातील शेती पीके पाण्याखाली जावून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . शेतकऱ्यांच्या या आर्थिक नुकसानीस शासन व संबधित ठेकेदार जबाबदार आहेत .पीकातून पाणी ओसरले तरी ऊसपीकाच्या सुरळीत पाणी जावून पीकांना फटका बसत आहे.
या पूलाचे विस्तारीकरण आवश्यक आहे . यासंबधी तातडीने कार्यवाही न झाल्यास सोमवार दि .२२ मे पासून सदर ठिकाणी बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा संबधित शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे . सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी ‘सार्वजनिक बांधकाम विभाग, खासदार संजय मंडलिक ,रस्ता ठेकेदार जितेंद्रसिंग कंपनी , मुरगूड पोलीस ठाणे यांना दिल्या आहेत.