बातमी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ३५० रुपये अनुदान देण्यास सरकारकडून टाळाटाळ :- सतेज पाटील

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा करणार ? ते सांगा

मुंबई : यावर्षी कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते. सरकारच्या घोषणेला तीन महिने झाले तरी अजून शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. सरकार मध्येच समन्वयाचा अभाव असून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केला आहे.

विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानावरील चर्चेत आमदार सतेज पाटील यांनी भाग घेत सरकारवर तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, मार्च महिन्यातील अधिवेशनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात चर्चा झाली.

मंत्री म्हणाले नाफेडमार्फत कांदा खरेदी करणार तर उपमुख्यमंत्री म्हणाले खरेदी चालू झाली, सरकारमध्येच विसंगती असल्याचे स्पष्ट दिसले. राज्य सरकारने अनुदान देण्याची घोषणा करुन तीन महिने झाले अजून पैसे का दिले नाहीत? सरकार म्हणते ३ लाख लोकांची यादी आहे पण काल संध्याकाळपर्यंत तर पणन खाते याद्यांची तपासणी करत होते. सरकारकडे अद्याप अनुदानास पात्र शेतकऱ्यांच्या याद्याच तयार नाहीत.

पुरवणी मागण्यात कांदा उत्पादकांसाठी किती निधीची तरतुद करण्यात आली हेही मंत्री सांगत नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी अनुदानाची वाट पहात आहे म्हणून सरकार शेतकऱ्यांना पैसे कधी देणार व किती देणार हे स्पष्ट करावे. सरकार जरी मदतीचा मोठा आव आणत असले तरी किलोमागे ३ ते ३.५ रुपयेच देणार असे दिसत आहे.

विरोधी पक्ष नेत्यांच्या मते ७०० ते ८०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे पण सरकार स्पष्ट करत नाही. मार्च महिन्यात जाहीर केलेले पैसे सरकार डिसेंबरच्या बजेटला देणार का? असा संतप्त सवाल सतेज पाटील यांनी विचारत शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार त्याची तारीख मंत्र्यांनी सांगावी, अशी मागणी पाटील यांनी केली. याला उत्तर देताना, मंत्री अब्दुल सत्तार यांनी १५ ऑगस्टच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *